लडाखमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. नियंत्रण रेषेजवळ भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये मोठया प्रमाणात तणाव आहे. नियंत्रण रेषेजवळ पहारा देणाऱ्या भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटीयन बॉडर्र पोलिसांच्या गस्ती पथकाला ताब्यात घेण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे. भारतीय जवानांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

लडाखमध्ये या आठवडयाच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर ही घटना घडली. भारतीय जवानांना ताब्यात घेतल्यानंतर मोठया प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पण दोन्ही बाजूच्या कमांडर्समध्ये बैठक झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

पँगगाँग तलावाजवळ घडलेल्या घटनाक्रमाची पंतप्रधान कार्यालयाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “मागच्या आठवडयात बुधवारी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर भारतीय जवानांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिस्थिती स्फोटक बनली होती. पण नंतर भारतीय जवानांना सोडून देण्यात आले” असे एका अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला सांगितले. “धक्काबुक्की होत असताना ITBP च्या जवानांची शस्त्रे सुद्धा काढून घेण्यात आली होती. पण नंतर जवानांना सोडण्यात आले व त्यांची शस्त्रे सुद्धा परत केली” असे या अधिकाऱ्याने सांगितले.

भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर

वर्चस्व गाजवण्याची चीनची जुनी खोड आहे. त्यामुळे सध्या लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

२०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधले आहेत.

घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत. २०१९ पासून चीनने दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये घुसखोरी सुरु केली. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.

Story img Loader