भारतीय वृत्तपत्रसृष्टीतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन् जरनॅलिझम’ पुरस्करांचे वितरण मंगळवारी संध्याकाळी केले जाणार आहे. घोटाळे उघड करणाऱ्या, बहुप्रतीक्षित न्याय मिळवून देणाऱ्या, निषेधाच्या आवाजाला बळ मिळवून देणाऱ्या बातम्यांचा यात सन्मान केला जाणार आहे. ज्या घटना या देशाच्या एखाद्या कोपऱ्यात घडल्यामुळे दुर्लक्षित राहिल्या होत्या, तर काही शहरी झगमगाटात झाकोळल्या गेल्या होत्या.. अशा अद्वितीय घटना आणि त्या प्रकाशझोतात आणणारे पत्रकार यांचा सन्मान या सोहोळ्यात करण्यात येणार आहे.
मंगळवारी संध्याकाळी ताज पॅलेस हॉटेल, नवी दिल्ली येथे भारतीय वृत्तपत्रसृष्टीतील या मानाच्या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. १७ विविध विभागांमध्ये २९ पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांच्या निवडीचे शिवधनुष्य १० जणांच्या निवड समितीने पेलले आहे. सन २०१० या वर्षांत केलेल्या वृत्तांकनाचा विचार या पुरस्कारासाठी केला गेला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान भारताचे ४० वे सरन्यायाधीश पी.सथशिवम् भूषविणार आहेत.
गतवर्षी हा पुरस्कार सोहळा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता. मुद्रित पत्रकारितेतील सवरेत्कृष्ट पत्रकाराचा पुरस्कार द पायोनियर या वृत्तपत्राच्या जे. गोपीकृष्णन् यांना मिळाला होता. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उजेडात आणण्याचे काम त्यांनी आपल्या बातम्यांमधून केले होते. ‘भारतीय वृत्तपत्रसृष्टीचे मानबिंदू म्हणून ज्या रामनाथजींकडे पाहिले जाते, त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. हा पुरस्कार जिंकावा हे माझे स्वप्न होते पण तो मी जिंकू शकेन असे मात्र मला वाटले नव्हते’, असे गोपीकृष्णन् यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितले.
रामनाथ गोएंका आणि द इंडियन एक्स्प्रेस यांच्या नि:स्पृह आणि धाडसी पत्रकारितेच्या वारशामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा असा पुरस्कार मिळणे ही प्रत्येक पत्रकारासाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया २००६-०७ च्या प्रसारण पत्रकारिता विभागातील सवरेत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विजेते राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली होती.
गेल्या वर्षीच्या रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारप्राप्त बातम्यांचे आणि वृत्तांकनांचे संकलन या वर्षी पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर, ‘सोशल मीडियाची भीती कुणाला?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
पुरस्काराचा इतिहास
सन २००६ मध्ये एक्स्प्रेस समूहातर्फे पत्रकारितेतील उत्तमतेचा रामनाथ गोएंका पुरस्कार सुरू झाला. रामनाथ गोएंका यांच्या भारतीय वृत्तपत्रसृष्टीतील योगदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सुरू केला गेला.