रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरोधात युद्ध पुकारत आक्रमण केलं. तेव्हापासून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ला सुरू आहे. दरम्यान, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने रशिया ज्या प्रकारे युक्रेनविरोधात बळाचा वापर करत आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोर्टाने बुधवारी रशियाला युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश जोन डोनोग्यू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि ICJ ला सांगितले की “रशिया ज्याप्रमाणे युक्रेनविरोधात बळाचा वापर करतंय ते चिंताजनक असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यात अतिशय गंभीर समस्या निर्माण होत आहेत. म्हणून रशियाने २४ फेब्रुवारी रोजी सुरू केलेली लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी.”
दरम्यान, ICJ मधील भारताचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांनी रशियाच्या विरोधात मतदान केले आहे. भंडारी यांनी युक्रेनमधील रशियन कारवायांवर त्यांच्या मतांच्या आधारे रशियाच्या विरोधात मतदान केले. न्यायमूर्ती भंडारी यांनी रशियाच्या विरोधात मतदान करणं ही भूमिका भारताने घेतलेल्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी आहे. रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारताने युनायटेड नेशन्समध्ये मतदान करणे टाळले होते. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करून तोडगा काढत हे युद्ध आणि शत्रुत्व संपवण्याचे आवाहन भारताने केले होते.
रशियाकडून हल्ले तीव्र
रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरूच आहेत. युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले. हे सर्वजण खाद्यपदार्थासाठी रांगेत उभे होते. रशियाच्या सैन्याने कीव्ह शहरातील नागरी वस्तीतही हल्ले सुरूच ठेवले आहेत. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,१४३ जण जखमी झाले, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. मात्र, मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच युक्रेनमधून आतापर्यंत सुमारे ३० लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे.