लंडनस्थित भारतीय जमीनदाराची पंजाबमध्ये हत्या करण्यात आली असून त्याच्या कुटुंबीयांनी या संदर्भात ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे मदतीची याचना केली आहे. लंडनच्या पश्चिमेकडील साऊथॉल येथे वास्तव्याला असलेल्या कुलवंतसिंग ग्रेवाल यांची लुधियानात ३० मे रोजी हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मालमत्तेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी ते पंजाबमध्ये आले होते आणि १६ मेनंतर त्यांना कोणीही पाहिले नाही. न्यायालयात ते हजर न राहिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय पोलिसांना सावध केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मिळाल्याचे आईने आपल्याला कळविले, असे ग्रेवाल यांचा मुलगा इक्बाल ग्रेवाल यांनी सांगितले. ग्रेवाल सिंगापूरहून ब्रिटनमध्ये १९५९ मध्ये आले आणि तेथेच स्थायिक झाले.