कामानिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या एका भारतीय व्यक्तीला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थानिक कोर्टाने ठोठावली आहे. रात्रीच्यावेळी विमान प्रवासात झोपलेल्या महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रभू राममूर्ती (वय ३५) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्पिरीट एअरलाइन्स या विमानात प्रभूची पत्नी आणि पीडित महिला या दोघी बाजूच्या सीटवर तर प्रभू हा मधल्या सीटवर बसला होता. लास वेगासपासून या विमानाने उड्डाण केले होते. याच वर्षी जानेवारी महिन्यांत ही घटना घडली होती. या प्रकरणी २३ वर्षीय पीडित मॉडेल तरुणीने आरोप केला की, आपण झोपेत असताना प्रभूने आपल्या पॅन्टची चैन आणि शर्टचे बटण खोलले होते तसेच त्याने आपला विनयभंगही केला होता.
या गंभीर लैंगिक छळाच्या गुन्ह्याबद्दल आरोपीला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती. मात्र, गुन्हा सिद्ध झाल्याने कोर्टाने त्याला ९ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ऑगस्ट २०१८मध्ये प्रभूवर हे आरोप सिद्ध झाले होते. या गुन्ह्यात ९ वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला भारतात पाठवून देण्यात येणार आहे.
इतरांना अशा प्रकारचा गुन्हा करण्यापूर्वी यातून धडा मिळेल, असेही कोर्टाने शिक्षा सुनावताना म्हटले. विमान प्रवासादरम्यान, प्रत्येकाला सुरक्षित प्रवास करण्याचा हक्क आहे. त्यामुळे या प्रश्नावर पीडित तरुणीने आवाज उठवला यासाठी कोर्ट तिच्या धैर्याचे कौतुक करते असेही कोर्टाने निकाल देताना म्हटले.
प्रभू राममूर्ती हा अमेरिकेतील डेट्रॉईट या उपनगरामध्ये राहतो. कामानिमित्त तो २०१५ मध्ये अमेरिकेत दाखल झाला होता. प्रभू आपल्या पत्नीसह ग्रँड कॅनन येथे सहलीला गेला होता. त्यानंतर लास वेगास येथून पुन्हा डेट्रॉईटकडे परतताना विमान प्रवासात ही घटना घडली होती.