हाँगकाँगमध्ये एका भारतीय व्यक्तीने दक्षिण कोरियन तरुणीचा विनयभंग केला आहे. पीडित तरुणी सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिमिंग करत होती. यावेळी आरोपीने पीडितेबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित तरुणी ही व्लॉगर (व्हिडीओ ब्लॉगर) असून ती आपल्या हाँगकाँग सहलीचं लाईव्ह स्ट्रिमिंग करत होती. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका भारतीय तरुणाने अचानक तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्याशी जबरदस्ती करू लागला. “ऐक, ऐक बेबी, माझ्यासोबत चल” असं म्हणत तो पीडितेवर बळजबरी करू लागला. यावेळी पीडितेनं “प्लिज माझ्या हाताला दुखापत करू नका,” असं म्हणत आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने बळजबरी करत तिला अधिक घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने मदतीसाठी आरडाओरड केली. यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
भारतीय व्यक्तीकडून दक्षिण कोरियन महिलेचा विनयभंग, पाहा VIDEO
या घटनेनंतर, हाँगकाँग पोलिसांनी ४६ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याबाबतचं वृत्त ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलं आहे. संबंधित आरोपी हा हाँगकाँगमध्ये वेटर म्हणून नोकरी करत होता. महिलेशी असभ्य वर्तन आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीचं नाव अमित जरीवाल असून तो हिमाचल प्रदेशमधील रहिवासी असल्याचा दावा सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी आहे.