Job In US : भारतातील अनेक विद्यार्थी मोठी स्वप्ने घेऊन अमेरिकेत शिक्षणासाठी जातात, दरवर्षी अशा पद्धतीने देश सोडून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. पण अमेरिकेसारख्या देशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्चही खूप येतो, अशावेळी तो खर्च भागवण्यासाठी विद्यार्थी कर्ज काढतात. पण अशा विद्यार्थ्यांना नंतर प्रचंड अडचणींचा सामाना करावा लागू शकतो. असाच काहीसा प्रकार एका रेडिट वापरकर्त्याबरोबर झाला आहे.
‘द टेकफिलॉसॉफर’ हे युजरनेम असलेल्या एका रेडिट वापरकर्त्यान त्याचा अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्याचा अनुभव शेअर केाला आहे. त्याने सांगितेल की तो पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेत स्थलांतरित झाला पण त्याला त्यानंतर योग्य नोगरी मिळाली नाही. याचा परिणाम असा झाला की तो आणि त्याच्या कुटुंबियांवर कर्जाचा मोठा डोंगर उभा रहिला. इतकेच नाही तर या सर्व आर्थिक संकटादरम्यान त्याचे वडील गंभीर आजारी पडल्याने त्याच्या अडचणीत आणखीच भर पडली. यानंतर त्याने यातून बाहेर कसे पडावे आणि आर्थिक संकटातून मार्ग कसा काढावा याबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी सोशल मीडियावर मदत मागीतली आहे
२७ वर्षीय वापरकर्त्याने सांगितलं की, त्याने २०२२ मध्ये अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ४० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले होत. तो एका सामान्य कुटुंबातील आहे आणि त्याचे वडील एक छोटासा व्यवसाय चालवतात, तो म्हणाला की असे असले तरी त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या शिक्षणासाठी सर्वकाही पणाला लावले.
नेमकं काय झालं?
सगळं काही व्यवस्थित सुरू होतं मात्र त्याला तेथे नोकरी मिळाली नाही. यासाठी त्याने आर्थिक मंदी, व्हिसाच्या मर्यादा आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी नसणे अशी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. अमेरिकेत त्याला दिनचर्या भागू शकेल इतके पैसे देखील मिळत नव्हते आणि दररोजच्या जेवणासाठी त्याला त्याच्या आई-वडीलांकडे पैसे मागावे लागत होते. पण त्याचे वडील आजारी पडले आणि त्यांचा उद्योग बंद पडल्याने त्याचा तो आधार देखील संपला. त्यानंतर त्याला नोकरी नसल्याने डोक्यावर मोठं कर्ज घेऊन परत यावे लागले.
त्याला कालांतराने भारतात नोकरी मिळाली, येथे त्याला ७५ हजार रुपये पगार मिळाला, मात्र यापैकी ६६ हजार रुपये त्याच्या हप्त्यांमध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे अवघे ९ हजार रुपये शिल्लक राहिले. कुटुंबाचा व्यवसाय आता सुरू झाला असल्याने त्याला थोडीशी मदत होत आहे. पण या वापरकर्त्याने सांगितलं की तो अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी फ्रीलान्स काम शोधत आहे. मात्र त्याच्या वडिलांची ढासळणारी तब्येत आणि त्याची रोजची नोकरी यामुळे तो मनाने आणि शारीरिकदृष्ट्या थकून गेला आहे.
या वापरकर्त्याने या सर्व परिस्थितीबाबत असहाय्यता व्यक्त केली आहे त्यांनी लिहिले की, “मला असं वाटतंय की माझं संपूर्ण आयुष्य या संकटातून बाहेर पडण्यातच जाईल. आम्ही एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब होतो…आणि आता आम्ही काठावर आहोत.”
त्यांनी सांगितले की त्यांनी कर्जाच्या फेररचनेसाठी बँकेशी संपर्क साधला आहे आणि इतर कामे शोधत आहे. मात्र आतापर्यंत त्याचं काहीही काम झालेले नाही आणि तो या सर्व परिस्थितीबाबत रेडिटवरील इतर वापरकर्त्यांकडून मार्गदर्शन घेत आहे.
नोकरी असल्यास कळवा…
त्याने त्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल या पोस्टमध्ये माहिती दिली आहे, त्याने सांगितले की, “मी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्समध्ये एमएससी केले आहे, आयटीमध्ये पदवीधर आहे. अमेरिकेतून एमएस करण्यापूर्वी मला १.५ वर्षांचा कामाचा अनुभव आहे आणि मला अमेरिकेत विनावेतन इंटर्नशिपचा अनुभव आहे आणि मी डिजिटल प्रॉडक्ट मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी कन्सल्टिंग, यूआय-यूएक्स डिझाइन, एआय कन्सल्टिंग, मार्केटिंग आणि सेल्स मध्ये काम करू शकतो. या क्षेत्रात तुमच्याकडे संधी असल्यास मला कळवा.” अनेकांनी या वापरकर्त्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी त्याला मदत देखील देऊ केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd