पूर्वीच्या काळी अनेक धनदांडग्यांनी करचुकवेगिरीसाठी आपला काळा पैसा स्वित्र्झलडमधल्या बँकांमध्ये ठेवला होता; आता स्वीस बँकांनी ही गुप्तता संपवली असून कुणाचा किती पैसा तिथे आहे, याची माहिती विविध देशांना दिली जाणार आहे. अर्थातच ही माहिती भारतालाही मिळणार आहे. कुणाचा किती काळा पैसा या खात्यात आहे, हे उघड होणार असल्याची कुणकुण गेले वर्षभर लागल्याने भारतीय धनदांडग्यांनी २०१२पासूनच आपले पैसे मोठय़ा प्रमाणात काढून घेतले आहेत.
नव्या निर्णयामुळे स्वीस बँकेतील काळ्या पैशाचे गूढ आता त्यामुळे उरणार नाही. आता संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय तिच्या नावावर स्वीस बँकेत किती पैसा आहे हे संबंधित देशाच्या सरकारने विनंती केल्यास सांगितले जाऊ शकते. स्वीस बँकेत नेमका किती काळा पैसा आहे हे शोधण्यासाठी भारताने खूप प्रयत्न केले पण त्यात फारसे यश आले नव्हते. आता जर तो काळा पैसा भारतात आणला तर सगळी गरिबी दूर होईल वगैरे दावेही केले जात आहेत.
स्वीस फेडरल कौन्सिलच्या निवेदनात म्हटले आहे, की ओइसीडीच्या करारावर स्वित्र्झलडने स्वाक्षरी केल्याने आता कुणाचा किती पैसा स्वीस बँकेत आहे, ही माहिती देता येणार आहे. या करारामुळे जे देश तेथील बँकात संबंधित व्यक्तींचे किती पैसे आहेत याची माहिती मागतील त्यांना ती दिली जाईल. फक्त ती माहिती मागण्याचे कारण द्यावे लागेल.
स्वीस बँकेतील निधीस गळती
स्वीस नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार भारतीयांचे ९,००० कोटी रुपये २०१२ अखेर तेथे आहेत. एक वर्ष अगोदर त्यांचे १४,००० कोटी रुपये तिथे होते. स्वीस बँकेत एकूण पैसा २०१२ मध्ये कमी झाला असून तो आता १.६५ ट्रिलीयन अमेरिकी डॉलरवरून १.५ ट्रिलियन डॉलपर्यंत खाली आला आहे.