नेपाळमधील अन्नपूर्ण पर्वतावरून उतरत असताना बेपत्ता झालेला भारतीय गिर्यारोहक अनुराग मालू (वय ३४) याचा तब्बल आठवड्याभरानंतर शोध लागला आहे. खाली उतरत असताना कॅम्प तीनजवळ तो खाली पडला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. गेल्या आठवड्याभरापासून त्याला शोधण्याचं काम सुरू होतं. अखेर तो जिवंत सापडला असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
हेही वाचा >> अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून घेतलं ताब्यात, लंडनला पळून जाण्याच्या होती तयारीत
“अनुराग मालू जिवंत सापडला आहे. गंभीर अवस्थेत तो आम्हाला सापडले असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”, अशी प्रतिक्रिया त्याचा भाऊ सुधीर यांनी दिली. नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वत जगातील दहाव्या क्रमाकांचे उंचावरील पर्वत आहे. या पर्वताच्या कॅम्प तीन येथून खाली कोसळल्यानंतर त्याला शोधण्यासाठी मोहिम जोरात सुरू होती. आठवडाभर अथक परिश्रम केल्यानंतर तो अनुराग जिवंत सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती आली असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहे.
अनुराग मालू गेल्या आठवड्यात अन्नपूर्णा पर्वत चढण्यासाठी निघाला होता. १७ एप्रिलला खाली उतरत असताना ६,००० मीटर उंचीवर असताना तो खाली कोसळला. अनुराग मालू ८ हजार मीटरवरील सर्व १४ शिखरे आणि सातही खंडातील सात सर्वोच्च बिंदूंवर चढाई करण्याच्या मोहिमेवर होता. याच मोहिमेअंतर्गत तो अन्नपूर्ण पर्वतावर गिर्यारोहणासाठी गेला होता.
अनुराग मालू (३४) हा राजस्थानच्या किशनगड येथील रहिवासी आहे. अनुराग मालू हा व्यवसायाने उद्योजक असून कॅम्प IV वरून परतत असताना कॅम्प III च्या खाली कोसळला. गिर्यारोहक मोहीम संयोजकाच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना याची पुष्टी दिली होती.
हेही वाचा >> येमेनच्या राजधानीत आर्थिक मदत वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची घटना, ७८ नागरिकांचा मृत्यू
रेक्स करम – वीर चक्राने सन्मानित
अनुराग एक उत्कृष्ट गिर्यारोहक आहे, याआधी त्याने अनेक पर्वत चढले आहेत. त्यांना REX करम-वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे आणि ते भारताचे २०४१ अंटार्क्टिक युवा राजदूत बनले आहेत.
परराष्ट्र मंत्रालय नेपाळमधील दूतावासाच्या संपर्कात
या प्रकरणी अजमेरचे खासदार भगीरथ चौधरी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून बेपत्ता तरुणाच्या शोधात गती देण्याची आणि नेपाळमधील दूतावासाला मदत देण्याची विनंती केली होती. या घटनेची माहिती मिळताच अनुरागचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी प्रचंड घाबरले होते. खासदार भगीरथ त्याच्या शोधाशी संबंधित अपडेट्ससाठी सतत परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात होते.
अन्नपूर्णा हा जगातील दहाव्या क्रमांकाचा उंच पर्वत
अन्नपूर्णा पर्वत हा जगातील दहावा सर्वात उंच पर्वत आहे. गिर्यारोहकांसाठी सर्वात धोकादायक पर्वतांपैकी एक हा पर्वत आहे.