नरेंद्र मोदी यांच्या येथील सभेत रविवारी झालेल्या स्फोटमालिकेमागे इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याचे उघड होऊ लागले आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि पाटणा पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत दोन संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली असून त्यातील एकाचा इंडियन मुजाहिदीनशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, स्फोटातील मृतांची संख्या सहा झाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या येथील गांधी मैदानावरील सभेदरम्यान रविवारी कमी तीव्रतेचे सात बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीवरून एनआयए व पाटणा पोलिसांनी सोमवारी तौसिन आणि इम्तियाज या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यातील इम्तियाज याचे इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. मुजाहिदीनचा सदस्य असलेल्या तहसीन अख्तर याच्या इशाऱ्यावरूनच इम्तियाज याने पाटण्यातील सभेत स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. इंडियन मुजाहिदीनचा कमांडर रियाझ भटकळ याच्या मदतीनेच इम्तियाजने स्फोटके पुरवल्याचेही चौकशीतून उघड झाले आहे.
आठ जणांचे पथक : गांधी मैदानावर स्फोट घडवून आणण्यासाठी आठ जणांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यातील इम्तियाजने दुसऱ्या एकाच्या मदतीने पाटणा रेल्वेस्थानकातील प्रसाधनगृहात स्फोटकांची जुळवाजुळव केली. त्या वेळीच स्फोट होऊन एक जण जबर जखमी झाला. घटनास्थळावरून पळ काढत असतानाच पोलिसांनी इम्तियाजला अटक केली. त्यानंतर चौकशीची चक्रे वेगात फिरून पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले. इम्तियाजने दिलेल्या माहितीवरून तौसिनला अटक करण्यात आली.
मृतांची संख्या सहा
दरम्यान, सोमवारी जखमींपैकी एकाचे निधन झाल्याने स्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा झाली आहे. ८३ जखमींपैकी ३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुजाहिदीनचे रांची मॉडय़ुल
इम्तियाज हा इंडियन मुजाहिदीनने अलीकडेच स्थापन केलेल्या रांची मॉडय़ुलचा सदस्य असल्याची माहिती झारखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली. रविवारी रात्री रांचीतील ध्रुव परिसरात टाकलेल्या छाप्यातून ही बाब उघड झाल्याचे ते म्हणाले. शनिवारी इम्तियाज त्याचा पुतण्या तौफिक, तारिक व नोमान यांच्याबरोबर पाटण्याला गेले. रेल्वेस्थानकातील स्फोटात तारिक ठार झाला. त्यानंतर तौफिक व नोमान फरार झाले, तर पोलिसांनी इम्तियाजला अटक केल्याचे प्रधान यांनी सांगितले.