गुजरातमधील दंगलींपासून ‘मुस्लिमांचे कट्टर विरोधक’ म्हणून टीका झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतीय मुस्लिमांच्या देशभक्तीचे गोडवे गायले. पुढील आठवडय़ातील अमेरिका दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘भारतीय मुस्लीम हे देशासाठी जगतील आणि देशासाठीच मरतील’ असे उद्गार मोदींनी काढले.
गुजरातमधील दंगलींतील भूमिकेमुळे वादग्रस्त ठरलेले मोदी यांना अमेरिकेने याआधी अनेकदा व्हिसा नाकारला होता. मात्र पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पुढील आठवडय़ात अमेरिकेच्या पहिल्यावहिल्या दौऱ्यावर निघाले आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांनी केलेल्या वक्तव्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. भारतासह दक्षिण आशियातील मुस्लिमांना आपले सदस्य बनण्याचे आवाहन करणारी अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाची ध्वनिचित्रफीत अलीकडेच प्रसारित झाली होती. याबाबत मोदी यांनी ही भूमिका मांडली. आमच्या देशातील मुस्लिमांबाबतचा हा अन्यायकारक दृष्टिकोन आहे, असे ते म्हणाले.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अल-कायदाचा मोठा प्रभाव असताना भारतातील एक कोटी ७० लाख मुस्लिमांपैकी क्वचितच काही जण अल कायदाचे सदस्य आहेत. येथील मुस्लीम अल-कायदाला कसे फशी पडले नाहीत, अशी विचारणा मोदी यांना केली असता ‘याबाबतचे धार्मिक वा मानसिक विश्लेषण करण्याइतका मी तज्ज्ञ नाही’ असे उत्तर त्यांनी दिले. ‘परंतु जगात मानवतेचा बचाव करावयाचा की नाही हा प्रश्न आहे, मानवतेवर विश्वास असणारे एकत्र होणार की नाही, हा मानवतेविरुद्धचा संघर्ष आहे. एका देशाविरुद्ध अथवा एखाद्या वर्णाविरुद्धचा नाही, त्यामुळे आपल्याला मानवता आणि अमानवी कृत्य याच्या चौकटीत हा विषय बसवावा लागेल,’ असेही ते पुढे म्हणाले.
‘अचूक वेळ साधली’
पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचे स्वागत करतानाच काँग्रेसने मोदींवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ‘पंतप्रधानांनी अमेरिका दौऱ्यावर निघण्यापूर्वीच हे वक्तव्य करण्याची वेळ कशी साधली. हेच विधान ते स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही करू शकले असते. हा त्यांच्या अंतर्मनाचाच आवाज आहे का, असा प्रश्न पडतो. भारतीय मुस्लिमांबाबत जाणून घेण्यात त्यांनी एवढा वेळ का लावला,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सलमान खुर्शिद यांनी केला.
भारतातील मुस्लीम आपल्या तालावर नाचतील, असे जर कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. येथील मुस्लीम देशासाठी जगतील आणि देशासाठीच प्राण देतील. भारताचे वाईट व्हावे, अशी त्यांची अजिबात इच्छा नसेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा