Indian national stabbed to death in canada : कॅनेडामध्ये एका भारतीय नागरिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडामधील भारतीय दूतावासाने शनिवारी सकाळी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्याकडून ओटावाजवळील रॉकलँडमध्ये चाकू हल्ल्यानंतर एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या घटनेबद्दलची सविस्तर माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र कॅनडामधील भारतीय दूतावासाने सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

“चाकू हल्ल्यानंतर ओटावाजवळील रॉकलँड येथे झालेल्या भारतीय नागरिकाच्या मृत्यूमुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडिताच्या नातेवाईकांना शक्य ती सर्व मदत देण्यासाठी आम्ही लोकल कम्युनिटी असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचा संपर्कात आहोत,” अशी पोस्ट कॅनडामधील भारतीय दूतावासाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

कॅनडामधील न्यूज ब्रॉडकास्टर सीबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार क्लारेन्स-रॉकलँड येथे एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसर्‍याला अटक कण्यात आली आहे. मात्र भारतीय दूतावासाने पोस्ट केलेली घटना हीच आहे का? याबद्दल अद्याप स्पष्टता मिळू शकलेली नाही.

दरम्यान वर उल्लेख करण्यात आलेली घटना ही लॅलोंडे स्ट्रीट येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ च्या सुमारास घडली. हे घटनेचे ठिकाण ओटावा शहराच्या पूर्वेस अंदाजे ४० किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती ओंटारियो प्रोव्हिंशियल पोलिसांनी रेडिओ-कॅनडाला दिल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.