Indian Navy INS Trikand Aids Injured Pakistani Sailor : ओमान किनाऱ्याजवळ फ्रॅक्चर आणि रक्तस्त्राव झालेल्या एका पाकिस्तानी क्रू मेंबरला भारतीय नौदलाने वैद्यकीय मदत केली. हा सदस्य ओमान किनाऱ्यापासून सुमारे जवळपास साडेसहाशे किलोमीटर पूर्वेकडे असलेल्या मासेमारी जहाजावर होता. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भारतीय नौदलाच्या मोहिमेत मध्य अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस त्रिकंद या स्टिल्थ फ्रिगेटला शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी इराणी जहाज अल ओमेदीचा एक कॉल आला. यानुसार इंजिनवर काम करताना क्रू मेंबरच्या बोटांना गंभीर दुखापत झाल्याचं कळलं. क्रू मेंबरला एफव्ही अब्दुल रहमान हंजिया नावाच्या दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले होते. हे जहाज इराणला जात होते. त्यात १६ क्रू मेंबर्स होते, पैकी ११ पाकिस्तानी नागरिक (९ बलुच आणि २ सिंधी) आणि ५ इराणी नागरिक होते.
वैद्यकीय मदतीसाठी INS ने मार्ग बदलला
वैद्यकीय मदत देण्यासाठी आयएनएस त्रिकंदने जलद गतीने आपला मार्ग बदलला. जखमी झालेल्या क्रू मेंबरची ओळख पटली असून तो पाकिस्तानी (बलूच) नागरिक आहे आणि त्याला खूप फ्रॅक्चर आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती, यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.

INS त्रिकंदमधील वैद्यकीय पथकाने केली शस्त्रक्रिया
आयएनएस त्रिकंदमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक वैद्यकीय पथक होते. यामध्ये मरीन कमांडो (MARCOS) आणि जहाजाच्या बोर्डिंग टीमचाही समावेश होता. क्रू मेंबरला भूल देण्यात आली आणि टीमने जखमी बोटांवर लहान शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया तीन तासांहून अधिक काळ चालली आणि रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यात आला. या प्रक्रियेमुळे गँगरीनमुळे जखमी बोटांना होणारे कायमचे नुकसान टाळता आले.

भारतीय नौदलाने जहाजाला इराणमध्ये पोहोचेपर्यंत कर्मचाऱ्याला आधार देण्यासाठी अँटीबायोटिक्ससह वैद्यकीय साहित्य देखील पुरवले. त्यांच्या क्रूमेटचा जीव वाचवण्यासाठी वेळेवर मदत केल्याबद्दल संपूर्ण क्रूने भारतीय नौदलाचे मनापासून आभार मानले.