इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असून भारतीय नौदलाने आपली एक युद्धनौका पर्शियाच्या आखातात तैनात केली आहे.
आपत्कालीन उपाययोजना म्हणून ‘आयएनएस म्हैसूर’ ही युद्धनौका पर्शियाच्या आखातात तैनात करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही युद्धनौका तेथेच तैनात ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. ‘आयएनएस तर्काश’ ही आणखी एक युद्धनौका अडेनच्या आखातात तैनात करण्यात आली असून गरज भासल्यास भारतीयांच्या सुरक्षेसाठी या दोन्ही युद्धनौकांचा वापर केला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, इराकमधून भारतीयांची सुटका करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. भारतीय हवाई दलाचे विमानही सज्ज ठेवण्यात आले असून आदेश मिळाल्यास सी-१७ आणि सी-१३०जे सुपर हक्र्युलिस भारतीयांच्या सुटकेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
इराकमधून आतापर्यंत ३६ भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. इराकच्या विविध भागांत जवळपास १००० भारतीय वास्तव्य करीत आहेत़
अमेरिकेकडून ‘ड्रोन गस्त’
इराकमधील अमेरिकी लोकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेची सशस्त्र ड्रोन विमाने तेथे गस्त घालीत आहेत, अशी कबुली अमेरिकेने दिली आहे. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, सुन्नी अतिरेक्यांवर हल्ले करण्यासाठी या ड्रोन विमानांचा वापर केला जाणार नाही़
दरम्यान दहशतवाद्यांनी तिक्रित शहरात इराकी सैन्यावर हवाई हल्ले केले तसेच विद्यापीठाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. जिहादी अतिरेक्यांनी १००० लोकांना आतापर्यंत ठार केले आहे. इराकच्या स्वायत्त कुर्द विभागाने स्वयंशासनात माघार घेणार नसल्याचे सांगितले. कुर्दीश योद्धय़ांनी किरकुक शहरात दहशतवाद्यांचा जोरदार मुकाबला केला. उत्तरेकडील शहरातून अलीकडे १० हजार लोक पळाले असून वर्षभरात १२ लाख लोक स्थलांतरित झाले आहेत.

Story img Loader