‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. १५ वर्षांनंतर नौदलाच्या ताफ्यात नवीन पाणबुडी दाखल झाली असून आयएनएस कलवरीसोबत एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलवरी पाणबुडीचे लोकार्पण केले.

नौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींचे आयुष्यमान संपल्याने त्यांची जराजर्जर अवस्था होती. या पार्श्वभूमीवर १५ वर्षानंतर भारतीय नौदलात गुरुवारी नवीन पाणबुडी दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मोदी म्हणाले, आयएनएस कलवरीचे लोकार्पण करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी देशाच्या जनतेकडून नौदलाचे अभिनंदन करतो. कलवरीच्या निर्मितीमध्ये मदत करणाऱ्या फ्रान्सचे मी आभार मानतो. भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. टायगर शार्क म्हणजेच कलवरी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ वे शतक हे आशियाचे आहे. २१ व्या शतकातील विकासाचा मार्ग हिंद महासागरातून जाईल असे सांगितले जाते. त्यामुळे भारत सरकारच्या धोरणात हिंद महासागराला विशेष स्थान आहे असे त्यांनी सांगितले. हिंद महासागराबाबत भारत सतर्क असून या क्षेत्रातील शांततेसाठी भारतीय नौदल प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. सागरी मार्गाने येणारे दहशतवादी असो किंवा तस्करी किंवा पायरसी या सर्व समस्यांचा सामना करण्यात भारत महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे धोरण आणि शूरवीर जवानांमुळे जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना दणका देता आला. तसेच ‘वन रँक आणि वन पेन्शन’चा प्रश्नही आम्ही मार्गी लावला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

काय आहे कलवरीचे सामर्थ्य ?
सुमारे १२० दिवस कलवरीच्या सर्व प्रकारच्या सागरी चाचण्या पार पडल्या. स्टेल्थ बांधणी आणि नेमका लक्ष्यभेद करणारी यंत्रणा ही कलवरीची सामर्थ्ये असून पाणतीर त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून पाण्यातून भूपृष्ठावर तसेच पाण्यातून पाण्यात असा दुहेरी हल्ला करण्याची कलवरीची क्षमता आहे. तसेच पाण्यात पाणसुरुंग पेरणे, पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करणे या क्षमतांचाही कलवरीच्या सामर्थ्यात समावेश आहे. ८ डिसेंबर १९६७ मध्ये भारतीय नौदलात पहिली पाणबुडी दाखल झाली होती. तिचे नावही कलवरी असेच होते. ३१ मे १९९६ रोजी कलवरी निवृत्त झाली होती.

Story img Loader