ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू टँकरनौका उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या १६ पैकी नऊ क्रू सदस्यांचे प्राण वाचविण्यात भारतीय नौदलास यश आले आहे. भर समुद्रात उलटलेल्या तेल टँकरनौकेचा शोध घेण्यासाठी तसेच बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाने आएनएस तेग ही युद्धनौका तैनात केली आहे.
अधिक वाचा: भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची नावे कशी ठरतात?
वाचवण्यात आलेल्या नऊ क्रू सदस्यांपैकी आठ भारतीय तर एक श्रीलंकेचा नागरिक आहे. एमटी फाल्कन प्रेस्टीजचा कोमोरोस- ध्वज असलेली तेल टँकरनौका ओमानमधील दुकम बंदर शहराजवळ रास मद्राकाच्या आग्नेयेस २५ सागरी मैलांवर संपूर्ण क्रूसह उलटली.
१६ क्रू मेंबर्समध्ये तीन श्रीलंकेचे नागरिक होते. या भागात समुद्र खवळलेला असून जोरदार वारे वाहत असल्याने आव्हानात्मक हवामान परिस्थितीत हे बचाव कार्य सुरु आहे. नौदलाचे लाँग रेंज मेरीटाईम रेकॉनसन्स विमान P8I हे देखील बचाव कार्यात गुंतलेले आहे. marinetraffic.com या संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार हा तेल टँकर येमेनी बंदर शहर एडनकडे निघाला होता. ओमानच्या किनाऱ्याजवळ १५ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या टँकरने मदतीसाठी कॉल केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय दूतावासाने सांगितले की, ते ओमानी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत आणि शोध तसेच बचाव (SAR) कार्य ओमान सागरी सुरक्षा केंद्राद्वारे समन्वयित केले जात आहे.
© IE Online Media Services (P) Ltd