गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. मालदीवमध्ये असलेले भारताचे सैन्य माघारी घ्यावे, अशी भूमिका येथील सरकारने घेतलेली आहे. दुसरीकडे मालदीवची चीनशी जवळीक वाढली आहे. दरम्यान, चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आळा घालता यावा म्हणून भारताने मालदीवच्या जवळ एक लष्करी तळ उभारण्याचे ठरवले आहे.

मालदीवच्या जवळ भारताचे नवे लष्करी तळ

मिळालेल्या माहितीनुसार मालदीवमध्ये असलेले भारताचे सैन्य परत मायदेशी येण्यास सुरुवात होण्याआधी मालदीवच्या शेजारी उभारण्यात येणारे हे लष्करी तळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मालदीवमध्ये सत्ताबदल झाला असून येथे चीनचे समर्थक मोहम्मद मुईझ हे राष्ट्रध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. आम्ही सत्तेत आल्यानंतर मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्याला परत पाठवू असे आश्वासन तेथील नागरिकांना दिले होते. याच कारणामुळे भारत मालदीवच्या जवळ आपले लष्करी तळ उभारत आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या बेटांवर भारतीय नौदलाकडून आपल्या सैन्याला बळ देण्याचा प्रयत्न यातून केला जातोय, असे भारतीय नौदलाने म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारताला मालदीव महत्त्वाचे

मालदीव हा देश अनेक अर्थाने भारत तसेच चीनसाठी महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनेही भारत मालदीवच्या जवळ लष्करी तळ उभारू पाहात आहे. वेगवेगळ्या क्रियाकलापांवर नजर ठेवण्यासाठी या लष्करी तळाची मदत होणार आहे.

लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर हे नवे लष्करी तळ

लक्षद्वीपमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतीय लष्कराच्या नव्या तळाचे येत्या ६ मार्च रोजी उद्घाटन होणार आहे. भारताचा लक्षद्वीप हा भूभाग मालदीवच्या उत्तरेस सुमारे १३० किमी अंतरावर आहे. लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर हे नवे लष्करी तळ असणार आहे. भारतीय नौदलाचे याआधीच लक्षद्वीपच्या कावरात्ती बेटावर एक लष्करी तळ आहे. मात्र नवे लष्करी तळ हे मालदीवच्या आणखी जवळ असणार आहे.

Story img Loader