Plane crash in New York : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शनिवारी (तारीख १२ एप्रिल) एका विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. जॉय सैनी असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. अपघातात डॉ. जॉय यांचे पती मायकेल ग्रॉफ, मुलगी करिना ग्रॉफ, मुलगा जेरेड ग्रॉफ आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनाही प्राण गमवावे लागले. दरम्यान, डॉ. जॉय सैनी नेमक्या कोण होत्या? त्यांचे भारताशी काय नाते होते? न्यूयॉर्कमध्ये विमानाचा अपघात कशामुळे झाला? याबाबत जाणून घेऊ…

कोण होत्या डॉ. जॉय सैनी?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. जॉय सैनी यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. लहानपणीच त्या आपल्या आई-वडिलांबरोबर अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. पेनसिल्व्हेनियातील पिट्सबर्ग विद्यापीठातून जॉय यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्यांची ओळख डॉ. मायकेल ग्रॉफ यांच्याशी झाली. कालांतराने जॉय आणि ग्रॉफ यांच्यात प्रेम फुललं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जॉय सैनी स्त्रीरोग व मूत्रविकार तज्ज्ञ (युरोगायनेकॉलॉजिस्ट) होत्या. त्यांचे पती मायकेल ग्रॉफ न्यूरोसर्जन ( मेंदू-शस्त्रक्रिया तज्ज्ञ) होते. अपघातग्रस्त विमानाचे पायलय स्वत: डॉ. जॉय सैनी यांचे पती मायकेल ग्रॉफ हे होते.

जॉय सैनी यांची मुलगी होती फुटबॉल खेळाडू

या विमान अपघातात डॉ. जॉय सैनी यांची मुलगी करिना ग्रॉफ आणि मुलगा जेरेड ग्रॉफ यांचाही मृत्यू झाला. करिना ग्रॉफ ही एक फुटबॉल खेळाडू होती, तिला २०२२ च्या एनसीएए वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर जेरेड ग्रॉफ हा कायद्याचे शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह ठरला होता. डॉ. सैनी यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची दुसरी मुलगी अनिका आणि त्यांच्या आई कुलजीत सिंग यादेखील विमानाने प्रवास करणार होत्या. मात्र, खासगी कामानिमित्त निघाल्याने त्यांना घरीच थांबावं लागलं. त्यामुळे विमान अपघातातून त्यांचा जीव वाचला.

आणखी वाचा : धक्कादायक! खोलीबाहेर होणाऱ्या पतीला बेदम मारलं अन् खोलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; घृणास्पद कृत्य कुठे घडलं?

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला?

‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, ग्रॉफ-सैनी कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी त्यांच्या खासगी विमानाने कोलंबिया येथे निघाले होते. वेस्टचेस्टरच्या काउंटी विमानतळावरून शनिवारी (तारीख १२ एप्रिल) विमानाने उड्डाण भरले. विमानाचे पायलट स्वत: सैनी यांचे पती ग्रॉफ हे होते. दरम्यान, गतव्यस्थानापासून फक्त १० मैल (सुमारे १६ किमी) अंतरावर असताना मॅसॅच्युसेट्सच्या सीमेजवळ विमानात तांत्रिक बिघाड झाला. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाच्या (NTSNB) अधिकारी अल्बर्ट निक्सन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मायकेल ग्रॉफ यांनी कोलंबियाच्या धावपट्टीवर विमान उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने त्यांना सावधगिरीचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत विमानाने धावपट्टी चुकवून पुन्हा हवेत उड्डाण घेतले.

विमान क्रॅश होताच भीषण स्फोट

काही वेळानंतर नियंत्रण कक्षाने विमानाच्या उड्डाणाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना विमान सुरक्षित असल्याचे लक्षात आले. परंतु, ते हजारो फूट उंचीवरून वेगाने खाली येत होते. ही बाब लक्षात येताच नियंत्रण कक्षाने पुन्हा मायकेल जॉय यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा वैमानिकाशी संपर्क होऊ शकला नाही. काही कळण्याच्या आतच मायकेल यांचे खासगी विमान जवळच असलेल्या एका शेतात जाऊन कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमान क्रॅश होताच भीषण स्फोट झाला आणि त्यातील सर्व प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, असे एनटीएसबीचे अधिकारी टॉड इनमन यांनी सांगितले.

हेही वाचा : Crime News : दोन कवट्या हव्यात, ९० डॉलर्स… महिला चक्क फेसबुकवर विकत होती खरी मानवी हाडे; अटक झाल्यावर म्हणाली…

डॉ. मायकेल ग्रॉफ होते अनुभवी वैमानिक

‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, डॉ. ग्रॉफ हे एक न्यूरोसर्जन आणि अनुभवी वैमानिक होते. लहानपणापासून त्यांना वैमानिक होण्याची आवड होती. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी वडिलांकडून विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले होते. डॉ. जॉय सैनी यांनी गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावल्या होत्या. मॅसॅच्युसेट्स मेमोरियल मेडिकल सेंटर विद्यापीठात त्यांनी अटेंडिंग फिजिशियन आणि असोसिएट फेलोशिप प्रोग्राम डायरेक्टर म्हणून काम केले. त्यापूर्वी, जॉय सैनी एनवाययू मेडिकल सेंटर आणि इंडियाना युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथे सहायक प्राध्यापक म्हणून काम करीत होत्या. बोस्टन पेल्विक हेल्थ वेबसाइटवरील माहितीनुसार, जॉय सैनी त्यांच्या पती आणि कुटुंबियांबरोबर वेस्टनमध्ये राहत होत्या. प्रसिद्ध स्त्रीरोग व मूत्रविकार तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अपघाती मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

अमेरिकेतील विमान अपघातांच्या घटना

अमेरिकेत गेल्या वर्षभरात विमान अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये वॉशिंग्टन डीसीतील रेगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात झाला होता. ६४ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अमेरिकन लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडकल्याने ३० हून अधिक प्रवाशांचा आपले प्राण गमवावे लागले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये अपघातावर दु:ख व्यक्त केलं होतं. हेलिकॉप्टर आणि विमानाचा झालेला हा अपघात रोखता आला असता असं ते म्हणाले होते. त्यांनी कंट्रोल टॉवरच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले होते.