अमेरिकेतील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी (६ मे) अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. टेक्सासमधील डॅलस येथील शॉपिंग मॉलमध्ये हा भयावह प्रकार घडला. या दुर्दैवी घटनेत भारतीय तरुणी ऐश्वर्या थातिकोंडासह (वय-२७) नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या ही पेशाने इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपासून ती अमेरिकेत नोकरी करत होती. शनिवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तिचा मृत्यू झाला आहे.
‘एएनआय’च्या वृत्तानुसार, २७ वर्षीय भारतीय तरुणी ऐश्वर्या थातिकोंडा ही मूळची हैदराबादच्या सरूरनगर येथील रहिवाशी होती. ती डॅलस येथील एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत होती. घटनेच्या दिवशी शनिवारी ती आपल्या एका मित्राबरोबर डॅलस येथील एका शॉपिंग मॉलमध्ये आली होती. ऐश्वर्या शॉपिंग करत असताना एका माथेफिरुने मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला.
या भयावह घटनेत ऐश्वर्यासह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला आणि हल्लेखोराला ठार केलं. Mauricio Garcia असं हल्लेखोराचं नाव आहे. या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
या हल्ल्यात ऐश्वर्याच्या मित्रालाही दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त स्थानिक मीडियाने दिलं आहे. ऐश्वर्याचा मृतदेह लवकरच भारतात पाठवला जाणार आहे. तसेच तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.