Crime News : ५६ वर्षांच्या एका माणसाला आणि त्याच्या मुलीची अमेरिकेत हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी एका स्टोअरमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात वडील आणि मुलगी या दोघांची हत्या करण्यात आली.

२० मार्चला घडली घटना

२० मार्चला व्हर्जिनियामध्ये एका स्टोअरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेत प्रदीप कुमार पटेल आणि त्यांची मुलगी या दोघांचीही हल्लेखोराने हत्या केली. ही घटना लँकफोर्ड हायवे या ठिकाणी असलेल्या स्टोअरमध्ये घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जॉर्ज फ्राझइर असं या ४४ वर्षीय संशयिताचं नाव आहे. त्याला अॅकोमॅक येथील तुरुंगात धाडण्यात आलं आहे. अॅकोमॅकचे शेरीफ यांनी ही माहिती दिली. तेथील वेळेप्रमाणे २० मार्चला पहाटे ५.३० मिनिटांनी गोळीबाराची ही घटना घडली. या ठिकाणी वडील आणि मुलीचा मृत्यू झाला दरम्यान एका महिलेलाही गोळी लागली आहे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

प्रदीप कुमार हे मूळचे मेहसाणचे आहेत

प्रदीप कुमार पटेल हे मूळचे मेहसाणा येथील कनोदा गावातले रहिवासी होते. गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या मुलीला गोळ्या लागल्याने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली. अमेरिकेतील पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. हा बंदुकधारी हल्लेखोर दुकानात आला आणि त्याने थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यात पटेल आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झलाा.

हल्लेखोराचा वाद आणि गोळीबार

२० मार्चला सकाळी साडेपाचच्या दरम्यान आरोपी मद्य खरेदी करण्यासाठी स्टोअरमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा स्टोअर मालकाशी वाद झाला. यावेळी त्याने पटेल आणि त्यांच्या मुलीवर गोळीबार केला. या घटनेनंतर पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रदीपभाई पटेल यांना तीन मुली होत्या. प्रदीप पटेल आणि त्यांची मुलगी उर्वी सहा वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य करत होते. प्रदीप पटेल आणि उर्वी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या मुली आणि जावई अमेरिकेत पोहचले आहेत. अमेरिकेत पटेल आणि त्यांच्या मुलीची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथील गुजराती समाजाने शोक व्यक्त केला आहे. शेरिफ यांच्या माहितीनुसार जॉर्ज फ्राझियरला अटक करण्यात आली आहे. हत्येचा प्रयत्न, हत्या, घातकी शस्त्र बाळगणं आणि त्याचा वापर करणं या सगळ्या कलमांचे गुन्हे त्याच्याविरोधात लागू करण्यात आले आहेत. News 18 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.