अमेरिकेत स्थायिक होण्याचे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. त्यादृष्टीने अनेकांचे प्रयत्नही सुरू असतात. या स्वप्नांचा काही लोकांकडून गैरफायदा घेतला जातो. अमेरिकेत स्थायिक होण्यास मदत करण्याचे आमिष दाखवत त्यांना फसवलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशाच पद्धतीने ८०० भारतीयांची अमेरिकेत तस्करी केल्याच्या आरोपावरून एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे भारतातून अमेरिकेत नेण्यासाठी अनेक बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्यात आला आहे. यापैकी एक म्हणजे कॅनडा ते अंतिम स्थानकापर्यंत पोहोचण्याकरता वाहतुकीची सुविधा पुरवणाऱ्या एका खासगी ॲप कंपनीचा वापर करण्यात आला आहे.
राजिंदर पाल सिंग असं या व्यक्तीचं नाव असून तो जसपाल गिल या नावानेही ओळखला जातो. त्याने उबर ॲपचा वापर करून ८०० हून अधिक भारतीयांची अमेरिकेत तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या गुन्ह्याप्रकरणी त्याला तीन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. “जसपाल गिल हा तस्करी करणाऱ्यांच्या टोळीचा सदस्य होता. कॅनडातून सीमेपलिकडे आणणारी एक टोळी आहे. या टोळीचा जसपाल गिल सदस्य आहे. या टोळीत सहभागी असल्याचा गुन्हा जसपालने फेब्रुवारी महिन्यात कबुल केला होता. अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे”, असे वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचा >> “जय हरी विठ्ठल!” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून शुभेच्छा, ट्वीट करत म्हणाले…
तस्करीसाठी कट रचने, मनी लॉड्रिगंप्रकरणी जसपाल गिल यांना ४५ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चार वर्षांच्या कालावधीत जसपाल गिल यांनी ८०० हून अधिक लोकांची अमेरिकेत तस्करी केली. कॅनडातून सीमा ओलांडून वॉशिंग्टन राज्यात हे ८०० भारतीय आल्याची माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे. सिंग यांच्या कृतींमुळे सुरक्षा धोक्यात आली असून तस्करी केलेल्या व्यक्तींचाही जीव भारत ते युएस या प्रवासादरम्यान धोक्यात आला होता.
अमेरिकेत स्थायिक होऊन चांगले जीवन जगण्याची आस असलेल्या लोकांना या तस्करीत हेरण्यात आले होते. कॅनडातून वॉशिंग्टन येथे नेण्याकरता सिंग यांनी उबरचा वापर केला होता. २०१८ च्या मध्यापासून ते मे २०२२ पर्यंत ६०० हून अधिक भारतीय अमेरिकेत अशापद्धतीने आले होते. या उबर प्रवासासाठी जुलै २०१८ ते एप्रिल २०२२ या कालावधीत ८० हजार डॉलरपेक्षाही अधिक खर्च आला आहे. कॅनाडातून भारतीयांना अंतिम स्थळी नेण्याकरता उबरच्या भाड्याच्या वाहनांचा वापर करण्यात आला होता. पहाटेच्या दरम्यान या प्रवासाला सुरुवात केली जायची. हा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केला जात होता.
हेही वाचा >> भीम आर्मी संघटनेचे चंद्रशेखर आझाद हल्लाप्रकरणी चौघेजण पोलिसांच्या ताब्यात, हल्लेखोरांची चारचाकीही जप्त
या तस्करीतून मिळालेली कमाई छुप्या मार्गांनी लपवली गेली. तसंच, कॅलिफोर्नियातील एका निवासस्थानी अधिकाऱ्यांना ४५ हजार डॉलरच्या रोख रकमेसह काही बनावट ओळखपत्रेही सापडली आहेत. जसपाल गिल हे अमेरिकेचे अधिकृत रहिवासी नसल्याने त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर देशातून तडीपार केले जाणार असल्याची शक्यता असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.