१३ बलात्काराच्या गुन्ह्यांसह ३९ गुन्ह्यांत दोषी ठरलेल्या भारतीय वंशाच्या बालेश धनखडला ऑस्ट्रेलियात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बालेश धनखड हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा माजी नेता होता. तसंच, ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाचा (Overseas Friends of BJP – भाजपाचा विदेशातील समर्थक/हितचिंतक) एकेकाळी प्रमुख सदस्य होता. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नोकरीच्या आमिषाने तरुणींची फसवणूक

बनावट नोकरीच्या मुलाखतींच्या नावाखाली त्याने अनेक महिलांना आमिष दाखवलं होतं. त्यांना ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप धनखडवर आहे. २०२३ मध्ये त्याच्यावर बलात्काराचे १३ गुन्हे सिद्ध झाले होते. तसंच, एकूण ३९ गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला होता. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वांत धोकादायक बलात्कारी म्हणून ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी त्याचं वर्णन केलं आहे.

भाजपाकडूनहीन निषेध

२०२३ मध्ये सिडनी न्यायालयाने धनखडल दोषी ठरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्याचा निषेध केला होता. तसंच, धनखडने २०१८ सालीच त्याचं पद सोडल्याची माहिती दिली होती. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मायकल किंग यांनी निकाल देताना बालेश धनखडच्या गुन्ह्यांचा निषेध केला. तसंच त्याची कृत्ये पूर्वनियोजित, काळजीपूर्वक अंमलात आणलेले असल्याचं म्हटलं. पीडितांच्या भवितव्याचा कोणताही विचार न करता त्यांच्याकडून लैंगिक सुख मिळवल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला.

अत्याचारादरम्यान बेशुद्ध किंवा गंभीरपणे अशक्त असलेल्या कोरिअन महिलांना तो लक्ष्य करत असे. त्याने हे अत्याचार रेकॉर्डही करून ठेवले होते. तसंच, पीडित महिलेच्या सौंदर्यावरून, बुद्धीमत्तेवरून त्यांची रँकिंगही करण्यात आली होती. याचा वापर नोकरीचं आमिष दाखवण्यासाठी केला जात असे. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याने पाचव्या महिलेला लक्ष्य केल्यानंतर त्याचे गुन्हे उघडकीस आले. त्याच्या सिडनी सीबीडी अपार्टमेंटवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात डेट-रेप ड्रग्ज आणि घड्याळ रेडिओमध्ये लपवून ठेवलेला व्हिडिओ रेकॉर्डरही सापडला.