लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनच्या पतंप्रधानपदी कोण विराजमान होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक असल्यामुळे समस्त भारतीयांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. दरम्यान, ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाने ऋषी सुनक यांची पक्षाचा नेता म्हणून निवड केली असून ते ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. लवकरच लिझ ट्रस यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. दरम्यान, सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच भारतातील दिग्गज व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या ब्रिटिशांनी भारतावर कित्येक वर्षे राज्य केलं, आता त्याच भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनचा कारभार पाहणार आहे, अशी भावना प्रसिद्ध लेखक चेतन भगत तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “आधी कमला हॅरीस आणि आता ऋषी सुनक; भारताने शिकलं पाहिजे की…”

१६०८ साली इस्ट इंडिया कंपनी सुरतच्या बंदरावर भारतात आली. ४१४ वर्षांनंतर आता ऐन दिवाळीच्या दिवशीच ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. वेळेनुसार सगळं बदलत असतं. दिवाळीच्या शुभेच्छा, असे चेतन भगत म्हणाला आहे.

हेही वाचा >>> भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान! ‘ऋषी’ ब्रिटनच्या गडगडलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणार?

तर ज्यांनी भारतावर कित्येक वर्षे राज्य केले, त्याच राज्याचा कारभार आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक पाहतील. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली आहे. ब्रिटनच्या पहिल्या हिंदू पंतप्रधानांना शुभेच्छा, असे अग्नीहोत्री म्हणाले आहेत.

लिझ ट्रस यांच्याकडून पदभार स्वीकारणार

दरम्यान, सत्ताधारी हुजूर पक्षाच्या ‘१९९२ समिती’ने सुनक यांना पक्षाचा नेता म्हणून घोषित केले आहे.याआधी ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. मात्र सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे शेवटी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनक हे मागील सात महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान आहेत. हंगामी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडून ते पंतप्रधापदाचा पदाभार स्वीकारतील.