भारतासह, पाकिस्तान, इराणमध्ये जोरदार धरणीकंपाची शक्यता
धरणीकंपांचे रिश्टर स्केल आणि मृतांची संख्या याबाबतचे वृत्त त्या त्या दुर्घटनांशी कोणताही संबंध नसलेल्या सुरक्षित जगाला कायम भीतीचा सूक्ष्म ओरखडा देत असते. मात्र अशी दुर्घटना होण्याआधी निर्धास्त जगण्यात मश्गुल राहण्याचे कुणीच टाळत नसते. भारत आणि शेजारील राष्ट्रांच्या भूकंपभीतीहीन भिंतींना तडे देणारा इशारा लंडनमधील शास्त्रज्ञांनी दिला आहे. यानुसार भारतासह, पाकिस्तान, इराण, ओमानच्या किनारपट्टीखालील भागाला ९.१ रिश्टर स्केल भीषण भूकंपाचा धोका संभवतो.
जुने काय?
या परिसरात आतापर्यंत १९४५मध्ये ८.१ रिश्टर स्केलचा तर १९४७ मध्ये ७.३ रिश्टर स्केलचे हे दोन मोठे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे भूकंपाच्या मोठय़ा धक्क्यांचा विचार या भागात केला जात नाही. मात्र संशोधकांच्या अभ्यासात हा धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. साऊदम्टन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. समुद्राखाली होणारे भूकंप किंवा सुनामी यामुळे या पश्चिम किनारपट्टीला धोका संभवतो असा इशाराही देण्यात आला आहे. त्यासाठी यापूर्वीच्या भूकंपांचा अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
धोका काय?
 भारतासह, पाकिस्तान, इराण, ओमानच्या किनारपट्टीखालील भागाला ९.१ रिश्टर स्केल इतका भूकंप तडाखा बसू शकतो. सुमात्रामध्ये २००४ मध्ये ९.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तसाच धोका या भागाला आहे. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हे धोके जाणून या भागात यापूर्वी झालेल्या भूकंपाचा इतिहास पाहून नियोजन करण्याचा सल्ला साऊदम्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.