संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या संमतीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. सात आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाचा १० मे रोजी समारोप होणार असून २२ मार्च ते २२ एप्रिलदरम्यान अधिवेशनाला विश्रांती असेल. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे ‘अर्थपूर्ण’ अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल रेल्वे अंदाजपत्रक मांडतील, तर २८ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम सादर करणार असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागलेले असेल. २७ फेब्रुवारी रोजी २०१२-१३ चा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाईल. पहिल्या आठवडय़ातील अर्थसंकल्पीय कामकाजानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार राज्यसभेत सुधारित लोकपाल विधेयक मांडण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारीच मंजुरी दिली आहे. यंदा अधिवेशनाचा उत्तरार्धातील कालावधी दोन आठवडय़ांनी कमी करण्यात आला आहे. शिवाय मध्यंतराचा कालावधीही २५ ऐवजी ३० दिवसांचा करण्यात आला आहे.