Nepal Plane Crash: रविवारी नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.
या दुर्दैवी अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. विमानातील एका भारतीय प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. अपघात होण्यापूर्वी काही मिनिटं आधी त्याने हा व्हिडीओ सुरू केला होता. या व्हिडीओत अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली आहे. सुरुवातीला विमान हलल्यानंतर थेट अपघातग्रस्त विमानाला लागलेली आग संबंधित व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. याबाबतचं वृत्त ‘एनडीटीव्ही इंडिया’ने दिलं आहे. ‘लोकसत्ता’ या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
हेही वाचा- लँडिंगच्या १० सेकंद आधी घडलं विपरीत, विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत
अभिषेक कुशवाह (२५), सोनू जैस्वाल (३५), विशाल शर्मा (२२), संजय जैस्वाल (३५) आणि अनिल कुमार राजभर (२७) असं मृत पावलेल्या पाच भारतीय नागरिकांची नावं आहेत, याबाबतची माहिती विमानतळ प्रशासनाने आली. संबंधित सर्वजण उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गाझीपूर येथील रहिवासी होते. या पाचपैकी चार भारतीय शुक्रवारीच भारतातून काठमांडूला पोहोचले होते. रविवारी त्यांचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे.
नेपाळमधील विमान अपघाताचा व्हिडीओ:
हेही वाचा- विश्लेषण : नेपाळमध्ये हवाई वाहतूक धोकादायक का आहे?
या विमानात एकूण ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. यामध्ये ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता,” अशी माहितीही विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.