Air India Urinating Incident: एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा अश्लाघ्य अशी घटना घडली आहे. दिल्ली – बँकॉक असा प्रवास करणाऱ्या (AI 2336) भारतीय प्रवाशाने जपानी नागरिकाच्या अंगावर लघुशंका केली. याआधीही एअर इंडियाच्या विमानात अशी घटना घडलेली आहे. त्यामुळे विमान कंपनीला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. नुकत्याच झालेल्या घटनेतील पीडित जपानी व्यक्ती एका मोठ्या कंपनीची अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये सदर घटना घडली.
लघुशंका करणाऱ्याने माफी मागितली
दरम्यान, ज्या प्रवाशाने हे कृत्य केले, त्याने तात्काळ माफी मागितली. ज्यांच्यावर लघुशंका करण्यात आली, त्या जपानी अधिकाऱ्याने याबाबत अधिकृत तक्रार दाखल करण्यास नकार दिला. विमान बँकॉकला उतरताच त्यांना तात्काळ निघायचे होते, म्हणून त्यांनी तक्रारीत वेळ न घालविण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या केबिन क्रू सदस्यांनी आरोपी प्रवाशाला इशारा देऊन सोडून दिले. तसेच विमानातील इतर प्रवाशांनीही कोणताही आक्षेप नोंदविला नाही.
या घटनेवर आता एअर इंडियाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एअर इंडियाच्या निवेदनात म्हटले की, “एआय २३३६ या दिल्ली ते बँकॉक प्रवास करणाऱ्या विमानात ९ एप्रिल २०२५ रोजी एका प्रवाशाने बेशिस्त वर्तन केले. केबिन क्रूने सर्व निर्धारित प्रक्रियांचे पालन केले आणि ही बाब अधिकृत यंत्रणांना कळवली आहे.
एअर इंडियाने आरोपी प्रवाशाला योग्य ती समज दिली आहे. तसेच या घटनेतील पीडित व्यक्तीला बँकॉकला उतरताच सर्व ती मदत दिली गेली. तसेच त्यांना तक्रार दाखल करण्यासाठीही विनंती करण्यात आली. मात्र सदर व्यक्तीने तक्रार दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र स्थायी समिती स्थापन केली जाईल आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवाशाविरोधात कारवाई केली जाईल.
डीजीसीएने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून एअर इंडिया काम करत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
शंकर मिश्रा लघुशंका प्रकरण
२०२२ साली एअर इंडिया विमानात घडलेले शंकर मिश्रा लघुशंका प्रकरण बरेच गाजले होते. मुंबईमध्ये राहणाऱ्या मिश्रा यांनी न्यूयॉर्क ते दिल्ली या विमानात एका वृद्ध महिलेवर विमानातच लघूशंका केली होती. यानंतर मुंबईत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शंकर मिश्रा यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर मिश्रा काम करत असलेल्या कंपनीतूनही त्यांना काढून टाकण्यात आले होते.