राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कधी चुरस तर कधी एकतर्फी लढत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांची उमेदवारी सत्ताधारी भाजपने जाहीर केल्यावर, देशाच्या १४ व्या राष्ट्रपतींची निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणूक होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. आतापर्यंत १९७७ मध्ये नीलम संजीव रेड्डी यांचा अपवाद वगळता राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुका कधी चुरशीच्या तर कधी अगदीच एकतर्फी झाल्या आहेत. यंदा निवडणूक झाल्यास फार काही चुरशीची निवडणूक अपेक्षित नाही.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५० मध्ये पहिल्या राष्ट्रपतींची निवड झाली. ही निवड दोन वर्षांसाठीच होती. १९५२ मध्ये राष्ट्रपतिपदासाठी पहिल्यांदा निवडणूक झाली. १९५० मध्ये राष्ट्रपतिपदाची निवड करण्याचा विषय आल्यावर तत्कालीन गव्‍‌र्हनर जनरल रोजगोपालचारी ऊर्फ राजाजी यांनाच या पदावर कायम ठेवावे, अशी योजना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मात्र राजेंद्रप्रसाद यांच्या नावासाठी आग्रह धरला. राजाजी यांनी भारत छोडो आंदोलनाविरोधात भूमिका घेतली होती. त्यातून काँग्रेस खासदारांचा राजाजी यांच्या नावाला विरोध होता.

राष्ट्रपतिंच्या नियुक्तीसाठी नेहरू यांनी ५ ऑक्टोबर १९४९ रोजी खासदारांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत खासदारांनी आक्रमक भूमिका घेत नेहरू यांनी प्रस्तावित केलेल्या राजाजी यांच्या नावाला विरोध केला. शेवटी नेहरू यांना राजाजी यांच्या नावाचा आग्रह सोडून द्यावा लागला. २३ जानेवारी १९५० मध्ये झालेल्या बैठकीत राजेंद्रप्रसाद यांच्या नावाचा प्रस्ताव नेहरू यांनी मांडला आणि त्याला सरदार पटेल यांनी अनुमोदन दिले. १९५२ आणि १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राजेंद्रप्रसाद यांनी विजय मिळविला होता. १९५२ मध्ये निवडणुकीत राजेंद्रप्रसाद यांना पाच लाख मते तर त्यांच्या विरोधातील उमेदवार के. टी. शहा यांना ९३ हजार मते मिळाली होती. १९६२ मध्ये राजेंद्रप्रसाद यांना तिसऱ्यांदा संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. पण काँग्रेसने त्यांना संधी नाकारली होती.

इंदिरा गांधी यांची गुगली

१९६९च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून काँग्रेसमधील फुटीची सुरुवात झाली. पक्षातील सिंडिकेट गटाचे व काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष एस. निजीलिंगप्पा यांनी नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली. सिंडिकेट गटाला शह देण्यासाठी इंदिरा गांधी यांनी जगजीवन राम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याच वेळी राष्ट्रपतिपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे व्ही. व्ही. गिरी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. इंदिरा गांधी यांची एकूणच भूमिका लक्षात घेता निजीलिंगप्पा यांनी विरोधी नेत्यांशी चर्चा केली. विरोधकांचे उमेदवार सी. डी. देशमुख यांना पहिल्या पसंतीची तर रेड्डी यांना दुसऱ्या पसंतीची मते देण्याची विनंती केली होती. निवडणुकीला एक दिवस असताना इंदिरा गांधी यांनी काँग्रेस खासदारांना सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असा सल्ला दिला. यावरून विरोध गटाच्या संजीव रेड्डी यांना पाठिंबा देणार नाही हे सूचित केले. प्रत्यक्ष निवडणुकीत गिरी यांना ४ लाख २० हजार, रेड्डी यांना ४ लाख ५ हजार तर सी. डी. देशमुख यांना १ लाख १३ हजार मते मिळाली. राष्ट्रपतिपदाची निवडणूक एवढी कधीच चुरशीची झाली नाही.

१९७४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे फक्रुद्दिनअली अहमद यांनी विरोधी उमेदवाराचा सहजपणे पराभव केला होता. अहमद यांना ७ लाख ६६ हजार तर विरोधी उमेदवार चौधरी यांना १ लाख ८९ हजार मते मिळाली होती. अहमद हे दुसरे मुस्लीम राष्ट्रपती होते. झाकीर हुसेन यांच्याप्रमाणेच अहमद हे आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. १९७७ मध्ये अहमद यांचे निधन झाले. १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी जनता पक्षाचे सरकार होते. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी नृत्यांगना रुक्मिणीदेवी यांच्या नावाला पसंती दिली होती. पण त्यांनी नकार दिला होता. मग नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. रेड्डी बिनविरोध निवडून आले. राष्ट्रपतींच्या बिनविरोध निवडीचा हा एकमेव अपवाद आहे.  १९८२ च्या निवडणुकीत ग्यानी झैलसिंग यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. ‘माझ्या नेत्याने सांगितले तर झाडू हातात घेईन’ असे विधान केलेल्या झैलसिंग यांची शीख समाजातील नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने निवड करण्यात आली होती. १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार ’ सिंग यांच्या कारकीर्दीत झाले होते.

आर. व्यंकटरामन, शंकर दयाळ शर्मा आणि के. आर. नारायणन या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यात काहीच अडचण आली नाही.

कलाम यांना भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा

२००२ मध्ये भाजप सरकारने अणुशास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची उमेदवारी जाहीर केली. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या नावाचा विचार झाला होता. पण त्यांच्या नावावर सहमती होऊ शकली नाही. कलाम यांच्या उमेदवारीला काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता.

१९६७ आणि ६९मध्ये चुरशीची लढत

  • १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत दहा वर्षे उपराष्ट्रपतिपद भूषविलेले सर्वपल्ली राधाकृष्णन यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. ही निवडणूक अगदीच एकतर्फी झाली होती.
  • १९६७ मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत चुरस बघायला मिळाली होती. १९६७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला फटका बसला होता.
  • या पाश्र्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत पहिले मुस्लीम राष्ट्रपती झाकीर हुसेन यांना ४.७१ लाख मते तर विरोधी उमेदवार कोका सुब्बाराव यांना ३.६४ लाख मते मिळाली होती.
  • हुसेन यांच्या निधनानंतर १९६९ मध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक झाली होती.

प्रतिभा पाटील आणि प्रणब मुखर्जी</strong>

  • भाजपने आजच बिहारचे राज्यपाल कोविंद यांचे नाव अनपेक्षितपणे जाहीर केले. तसेच २००७ मध्ये काँग्रेसने राजस्थानच्या तत्कालीन राज्यपाल प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती.
  • २०१२ मध्ये ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांना देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळाली. पंतप्रधानपद न मिळालेल्या मुखर्जी यांना राष्ट्रपतिपद देऊन काँग्रेसने त्यांच्यावरील अन्याय दूर केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian presidential election history presidential election rajendra prasad to pranab mukherjee nda upa
First published on: 20-06-2017 at 03:10 IST