शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही भेट होणार असल्याच्या वृत्ताला ट्वीट करून दुजोरा दिला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या घटकांबाबत पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेवरून दोन देशांमधील संबंध ताणलेले असल्याच्या पाश्र्वभूमीवर एका वषानंतर ही भेट होत आहे. शुक्रवारी होणाऱ्या भेटीच्या वेळी मोदी सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात काठमांडूत सार्क परिषदेच्या वेळी मोदी आणि शरीफ यांची शेवटची भेट झाली होती. मात्र शुक्रवारी दोन्ही नेत्यांची भेट होऊन चर्चा होणार आहे. रमझानचा महिना सुरू होताना मोदी यांनी शरीफ यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या. बांगलादेशच्या दौऱ्यात मोदी यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर ताशेरे ओढले होते.

Story img Loader