हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय कैद्याचा मृत्यू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिनाह हॉस्पिटलमध्ये त्याचे निधन झाले. लाहोरच्या कोट लखपत कारागृहातून नुकतीच सुटका झालेले वकील तहसीन खान यांचा हवाला देऊन सूत्रांनी सांगितले की, १५ जानेवारी रोजी भारतीय कैदी चमलसिंग याने कपडे धुण्यासाठी नळाचे पाणी वापरले. हे पाहताच तुरुंगातील कर्मचाऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी चमलसिंग याला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोनच दिवसांनी तो मरण पावला. तथापि, चमलसिंग १५ जानेवारी रोजी मरण पावला. इतकेच पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आपल्याला कळविल्याचे भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सिंग याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी चमलसिंग याला निर्दयपणे मारहाण केली, इतकेच नव्हे तर भारतीय आणि अल्पसंख्याकांबद्दल अर्वाच्य भाषाही वापरली, असे तहसीन खान यांनी सांगितले. कोट लखपत तुरुंगात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला कैदी सरबजीतसिंग याच्यासह अनेक भारतीय असून ते भीतीच्या सावटाखाली आहेत, असेही खान म्हणाले.

Story img Loader