Indian Prisoners in Foreign Jails : परदेशातील भारतीयांच्या मुद्यांवर संसदेत शुक्रावारी चर्चा झाली. यावेळी केंद्र सरकारने परदेशातील तुरुंगात असलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर महत्वाची माहिती दिली. १० हजारांपेक्षा अधिक भारतीय परदेशी तुरुंगात आहेत, तर आतापर्यंत ४९ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेतील एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.

केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितलं की, यूएईमध्ये (UAE) फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नागरिकांची संख्या २५ आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, अशी माहिती मंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाला राज्यसभेत विचारण्यात आलं होतं की, अनेक भारतीय वर्षानुवर्षे परदेशात तुरुंगात आहेत का? परदेशात मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या भारतीयांचा तपशील आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी भारत सरकारने काय प्रयत्न केले आहेत, याची माहिती देण्यात यावी, यावर केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी ही माहिती सभागृहाला दिली.

मंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी काय माहिती दिली?

“मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सध्या परदेशातील तुरुंगांमध्ये अंडरट्रायलसह भारतीय कैद्यांची संख्या १०,१५२ एवढी आहे. सरकार परदेशी तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, सुरक्षा आणि कल्याण यांना उच्च प्राधान्य देत आहे. तसेच कीर्तीवर्धन सिंह यांनी यावेळी ८ देशांशी संबंधित डेटा शेअर केला. तसेच फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नागरिकांची संख्याही सांगितली. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आकडेवारीनुसार, २५ युएईमध्ये, ११ सौदी अरेबियामध्ये, ६ मलेशियामध्ये, तीन कुवेतमध्ये आणि प्रत्येकी एक इंडोनेशिया, कतार, अमेरिका आणि येमेनमध्ये आहेत. परदेशातील भारतीय मिशन पोस्ट परदेशी न्यायालयांनी मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत करतात. भारतीय मिशन पोस्ट तुरुंगांना भेट देऊन आणि न्यायालये, तुरुंग, सरकारी वकील आणि इतर संबंधित एजन्सींकडे त्यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करून कॉन्सुलर प्रवेश देखील प्रदान करतात. तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकांना अपील दाखल करणे, दया याचिका इत्यादींसह विविध कायदेशीर उपायांचा शोध घेण्यात देखील मदत केली जाते अशी माहिती देखील केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दिली.

तसेच गेल्या पाच वर्षांत परदेशात कोणत्याही भारतीय नागरिकांना फाशी देण्यात आली आहे का? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला. त्यावर कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितलं की, मलेशिया, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियामध्ये फाशी देण्यात आली आहे. दरम्यान, २०२४ मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये तीन भारतीयांना फाशी देण्यात आली, तर झिम्बाब्वेमध्ये एकाला फाशी देण्यात आली. २०२३ मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रत्येकी पाच भारतीयांना आणि मलेशियामध्ये एकाला फाशी देण्यात आली.

Story img Loader