भारताची गेल्या १० वर्षांत जेवढी स्थिती खालावली आहे तितकी जगातील कोणत्याही देशाने अनुभवली नसेल, असे मत व्यक्त करून सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी, जनतेला आता पर्याय हवा असल्याचे मत व्यक्त केले.
केंद्रातील यूपीए सरकारवर हल्ला चढविताना मुलायमसिंग म्हणाले की, सध्या भारताच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्राला त्याचप्रमाणे सुरक्षा आणि निधर्मी तत्त्वाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अशा प्रकारचा धोका कधीही निर्माण झाला नव्हता, असेही ते म्हणाले.
जनतेला आता तक्रारींचा उबग आला असून ते पर्याय शोधत आहेत. मोठे राजकीय पक्ष मतांच्या राजकारणात गुंतलेले असल्याने त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहता येणार नाही. त्यामुळे आता ही जबाबदारी प्रादेशिक पक्षांनाच उचलावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक येथे आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये देशाची राजकीय, आर्थिक स्थिती, सुरक्षेचा आणि निधर्मी तत्त्वांचा प्रश्न मांडण्यात येणार असून या बैठकीची सांगता त्यावरील निर्णयाने होणार आहे, असेही ते म्हणाले.
सीमेवर देशाच्या सुरक्षेला धोका असल्याची ओरड सपाकडून गेल्या २० वर्षांपासून केली जात असतानाही त्याकडे एनडीए आणि यूपीए सरकारने दुर्लक्ष केले. देशातील जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे. मात्र एनडीए आणि यूपीएच्या राजवटीत जनतेचा अपमान करण्यात आला आणि त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, असेही मुलायमसिंग म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा