भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयी सुविधा पुन्हा पूर्ववत करत केटरिंग व्यवस्था सुरू केली आहे. यामुळे करोनानंतर पहिल्यांदाच रेल्वेत प्रवाशांना जेवण मिळणं शक्य होणार आहे. या निर्णयानुसार प्रिमियम ट्रेन्समध्ये प्रवाशांना जेवणाची व्यवस्था देखील पुरवली जाईल. याबाबत रेल्वेने आपल्या सर्व विभागांना आदेश दिले आहेत. यानंतर आता रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडून केटरिंगच्या शुल्काची तपासणी करून त्याचा अंतिम निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन बुकिंग करताना तिथंही केटरिंगचा पर्याय निवडता येणार आहे.
कोणत्या रेल्वे गाड्यांमध्ये केटरिंगची व्यवस्था सुरू?
प्राथमिक स्तरावर सध्या राजधानी, शताब्दी, दुरोंतो, वंदे भारत, तेजस आणि गतिमान एक्सप्रेस या ‘प्रिमियम’ रेल्वे गाड्यांमध्ये केटरिंगची व्यवस्था उपलब्ध असेल. त्यामुळे या गाड्यांचं तिकिट बूक करत असताना देखील प्रवाशांना केटरिंग पर्याय निवडता येईल. ज्या प्रवाशांनी याआधीच तिकिट काढले आहेत त्यांना स्वतंत्रपणे केटरिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा : एका यूजर आयडीने एका महिन्यात १२ रेल्वे तिकिटे होतील बुक, त्याआधी करावे लागेल ‘हे’ काम
सध्या केटरिंगची ही व्यवस्था केवळ राजधानी, शताब्दी, दुरोंतो, वंदे मातरम, तेजस आणि गतिमान या रेल्वेंनाच असेल. आयआरसीटी विभागीय रेल्वे कार्यालयांना ही सेवा कधीपासून सुरू करायची याचे स्पष्ट निर्देश देणार आहेत. केटरिंगची व्यवस्था निवडण्याचा पर्याय रेल्वे तिकिट बुकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये देखील देण्यात येणार आहे. याशिवाय एसएमएस, ईमेलचाही वापर होणार आहे.
ज्यांनी आधीच तिकिटी बूक केलं त्यांचं काय?
ज्या प्रवाशांनी या घोषणेच्या आधीच तिकिट बूक केलंय त्यांनाही केटरिंग सेवा घ्यायची असेल तर त्यांना वेगळा पर्याय देण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांना आयआरसीटीच्या वेबसाईटवर केटरिंगसाठी अप्लाय करता येईल. ही सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना घेता येईल. यासाठी जेवणाचे पेमेंट अगोदर करावे लागणार आहे.