टोगोमधून गुरुवारी सुटका करण्यात आलेले भारतीय नाविक सुनील जेम्स यांचे शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीमध्ये आगमन झाले.
समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपावरून जेम्स हे टोगोच्या तुरुंगात गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षा भोगत होते.जेम्स अटकेत असताना त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जोपर्यंत जेम्स भारतात येत नाही, तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी जेम्सच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते.
समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपावरून ३१ वर्षीय सुनील जेम्स यांना मागील १६ जुलै रोजी पश्चिम आफ्रिकेतील टोगो या देशात अटक करण्यात आली होती. जेम्स अटकेत असताना २ डिसेंबर रोजी त्यांचा ११ महिन्यांचा मुलगा विवान आजारी होता. मात्र उपचारांना यश न आल्यामुळे अखेर त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवागरात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुनील यांची सुटका व्हावी यासाठी भारतीय अधिकारी टोगो प्रशासनाच्या संपर्कात होते. अखेर भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले असून टोगो प्रशासनाने सुनील यांची सुटका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian sailor captain sunil james lands in new delhi