अत्याधुनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रनिर्मितीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवून रशिया आणि भारत यांच्यातील संबंध बळकट करण्यास हातभार लावणाऱ्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ ए शिवाथानु पिल्लई यांना रशियाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  पिल्लई यांच्याबरोबरच भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रशियातर्फे परदेशी नागरिकाला दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. रशियाबरोबरील संबंध अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या परदेशी नागरिकांचा गौरव करण्यासाठी १९९४ साली ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ हा पुरस्कार सुरू करण्यात आला.भारत आणि रशिया संयुक्तपणे राबवित असलेला अत्याधुनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रनिर्मिती कार्यक्रम १९९८ साली सुरू करण्यात आला होता. १५ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर २९० किमी पल्ला गाठणारे हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये सामील करण्यात आले आहे. पिल्लई यांनी या कार्यक्रमासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत रशियाने त्यांचा सन्मान केला. दरम्यान, संरक्षणमंत्री ए. के. अंथोनी यांनी पिल्लई आणि जोशी यांचे अभिनंदन केले आहे.