अल्पवयीन मुलीबरोबर लैंगिक गैरवर्तन आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली सिंगापूरमध्ये दोषी ठरलेल्या ३१ वर्षीय भारतीयाला १३ वर्ष तुरुंगवास आणि छडीचे १२ फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिथल्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

उधयकुमार दक्षिणामुर्ती असे आरोपीचे नाव असून त्याने अल्पवयीन मुलीला वेगवेगळया भेटवस्तू देऊन तिच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तीन महिने पीडित मुलीला पत्नीसारखे वागवून तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असे सिंगापूरमधील माध्यमांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

उच्च न्यायालयाने उधयकुमारला शिक्षा सुनावताना चार अन्य आरोपही लक्षात घेतले. सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान हा गुन्हा घडला. उधयकुमारच्या गर्भवती प्रेयसीने त्याच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. तिने पोलिसात तक्रार केली.

उधयकुमारने अल्पवयीन मुलीची निरागसता आणि भोळेपणाचे शोषण केले आहे असे न्यायिक आयुक्त पँग खांग चाऊ शिक्षा सुनावताना म्हणाले. दोन वेळा मुलीबरोबर शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही असे उधयकुमारने कबूल केल्याचे वर्तमानपत्राने म्हटले आहे.

Story img Loader