पॅंूछ भागात पाच भारतीय सैनिकांच्या हत्येप्रकरणी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी केलेल्या विधानामुळे मंगळवारी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिक सहभागी होते की नाही, असा थेट उल्लेख न करत ‘पाकिस्तानी लष्कराचा गणवेश घातलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला’ असे उत्तर अँटनी यांनी संसदेत दिले. त्यावरून विरोधी पक्षांनी त्यांना धारेवर धरले.
  पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत झालेल्या चर्चेला उत्तर देताना अँटनी यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. त्या वेळी ‘पाकिस्तानी लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या अतिरेक्यांनी पूँछ भागात घुसखोरी करून आगळीक केली,’ असे विधान त्यांनी केले. अ‍ॅण्टनी यांच्या निवेदनामुळे संसदेत विरोधक चांगलेच संतप्त झाले. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात नसल्याचे सांगून अ‍ॅण्टनी हे पाकिस्तानला एक प्रकारे निर्दोष सोडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, अ‍ॅण्टनी आपल्या निवेदनावर ठाम राहिले. या घटकेला कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष काढू नये, असेही त्यांनी आवाहन केले. अँटनी यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या भाजप सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दुसरीकडे, लष्कराचे प्रवक्ते एस. एन. आचार्य यांनी या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर सहभागी होते, असे म्हटले. त्यामुळे अँटनी यांनी कोणी दिलेल्या माहितीच्या आधारे हे निवेदन केले, असा सवाल विचारण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा