भारतीयांमध्ये तंबाखू, पान यासारख्या मादक पदार्थांवरील खर्चाचं प्रमाण वाढल्याचं समोर आलं आहे. नुकतेच द हाऊसहोल्ड कन्जम्पशन एक्स्पेंडिचर सर्व्हे २०२२-२३ नावाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. याच अभ्यासातून एकूण खरघर्चामध्ये पान, तंबाखू यासारख्या पदार्थांवर खर्च करण्याचे प्रमाण गेल्या १० वर्षांत वाढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातही हा खर्च वाढला आहे.
तंबाखूजन्य पदार्थांवरील खर्चाचे प्रमाण वाढले
या अहवालातील माहितीनुसार ग्रामीण भागात २०२२-२३ साली एकूण घरखर्चापैकी तंबाखू आणि पान यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांवरील खर्चाचे प्रमाण ३.७९ टक्के वाढले आहे. हेच प्रमाण २०११-१२ साली ३.२१ एवढे होते. शहरी भागाचे सांगायचे झाल्यास हे प्रमाण २०११-१२ साली १.६१ टक्के होते. २०२२-२३ साली हेच प्रमाण २.४३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
शिक्षणावरील खर्चात घट
विशेष म्हणजे घरखर्चातील एकूण खर्चामध्ये मादक पदार्थांच्या सेवनासाठीच खर्चा वाढलेला आहे. तर शिक्षणावर होणारा खर्च मात्र कमी झाला आहे. २०११-१२ साली शहरी भागात हा खर्च ६.९० टक्के होता. २०२२-२३ साली शिक्षणावरील हाच खर्च ५.७८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ग्रामीण भागात सांगायचे झाल्यास हा खर्च २०११-१२ साली ३.४९ टक्के होता. आता २०२२-२३ साली तो ३.३० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.
प्रक्रिया केलेल्या अन्नावरील खर्चात वाढ
द नॅशनल सॅम्पल सव्हे ऑफीस (एनएसएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीसाठी हे एचसीईएस सर्वेक्षण केले आहे. याच सर्वेक्षणाच्या अहवालात वेगवेगळी पेय आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावर होणाऱ्या खर्चाविषयीही सांगण्यात आले आहे. शहरी भागांत पेय आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावर २०११-१२ मध्ये ८.९८ टक्के खर्च केला जात होता. आता हाच खर्चा २०२२-२३ मध्ये १.६४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ग्रामीण भागात हा खर्च २०११-१२ साली ७.९० टक्के होता. २०२२-२३ मध्ये हा खर्च ९.६२ टक्क्यांपर्यंत वाढलाय.