परदेशी हेरसंस्थांचा हस्तक्षेप हा देशाच्या स्थैर्य आणि सुरक्षेसाठी काळजीचा विषय असल्याचे सांगत पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतीय गुप्तहेर संघटना ‘रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग’ (रॉ) पाकिस्तानात कारवाया करीत असल्याचा आरोप केला आहे.
आजवर पाकिस्तानमधील अनेक नेते आणि अधिकाऱ्यांनी ‘रॉ’ पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि सिंध व बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावादास खतपाणी घालत असल्याचा आरोप केला होता. मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांनी प्रथमच हा आरोप केला आहे.
शरीफ यांनी शनिवारी पाकिस्तानी हेरसंस्था इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) मुख्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांच्यासमवेत अर्थमंत्री इशाक दर, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, गृहमंत्री चौधरी निसार, सरताज अझिज आणि तारिक पातेमी हे विशेष सल्लागार, लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ आदी उपस्थित होते. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीम सलीम बजवा यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार आयएसआयप्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांनी पंतप्रधानांसह सर्वाना अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षेच्या मुद्दय़ांवर माहिती
दिली.
या वेळी शरीफ यांनी दहशतवाद निपटून काढून पाकिस्तानला एक संपन्न देश बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय नेत्यांच्या ताज्या वक्तव्याबद्दल काळजी व्यक्त करीत परदेशी कारवाया हाणून पाडू, असेही शरीफ यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी भारतीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले होते की भारत दहशतवादाचा मुकाबला दहशतवादानेच करील. त्यावर पाकिस्तानमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. शरीफ यांच्या वक्तव्याला त्याचा संदर्भ होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा