अमेरिकेतल्या जॉर्जिया शहरात एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. जॉर्जियामधील एका बेघर व्यक्तीने त्याचा खून केला आहे. हा भारतीय विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून माणुसकीच्या नात्याने त्या भिकाऱ्याची मदत करत होता. दरम्यान, या हत्येचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. भिकाऱ्याने हातोडीच्या सहाय्याने आधी त्या विद्यार्थ्याचं डोकं फोडलं. त्यानंतर त्याचा चेहरा आणि डोक्यावर चाकूने ५० हून अधिक वार केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक सैनी (२५) असं या मृत भारतीय विद्यार्थ्याचं नाव आहे, जो जॉर्जियातल्या एका दुकानात पार्ट टाईम काम करत होता. विवेक आणि त्या दुकानात काम करणारे त्याचे इतर सहकारी गेल्या काही दिवसांपासून दुकानाबाहेरच्या रस्त्यावर फिरणाऱ्या एका भिकाऱ्याची मदत करत होते. त्याचदरम्यान, त्या भिकाऱ्याने विवेकची हत्या केली. स्थानिक वृत्तवाहिनीने विवेक सैनीच्या हत्येबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार १६ जानेवारी रोजी विवेकची हत्या करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं की, विवेक क्लीवलँड रोडवरील शेवरॉन फूड मार्टमध्ये काम करत होता. या दुकानातच एका भिकाऱ्याने हातोडी आणि चाकूने हल्ला करून विवेकची हत्या केली.

जूलियन फॉकनर असं या खुन्याचं नाव असून त्याचं वय ५३ वर्षे इतकं आहे. डब्ल्यूएसबी-टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, १४ जानेवारी रोजी या दुकानातील कर्मचाऱ्यांनी फॉकनरला त्यांच्या दुकानात येऊ दिलं. त्यांनी या बेघर व्यक्तीला (फॉकनर) जेवण, वेफर्स, शितपेय आणि पाणी दिलं. विवेकसह शेवरॉन मार्टमधील कर्मचारी पुढचे तीन दिवस त्याला जेवण आणि पाणी देत होते.

दुकानातील एका कर्मचाऱ्याने आणि विवेकच्या सहकाऱ्याने सांगितलं, त्याने आम्हाला चादर मागितली, परंतु, आमच्याकडे चादर नसल्याने आम्ही त्याला एक स्वेटर दिलं. तो नेहमी दुकानात यायचा, फिरायचा. आम्हाला सिगारेट, पाणी आणि जेवण मागायचा. तो नेहमी दुकानात बसायचा. आम्हीही त्याला हाकललं नाही कारण बाहेर खूप थंडी आहे. तीन दिवस तो दुकानातच थांबला. त्यानंतर १६ जानेवारी रोजी विवेक फॉकनरला म्हणाला, आता तुम्ही इथून जायला हवं. त्यावर तो संतापला होता.

हे ही वाचा >> आत्महत्या केलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आई आणि वडिलांनीही संपवलं आयुष्य, दोन दिवस लटकत होते तीन मृतदेह

पोलिसांनी हत्येबाबतची माहिती देताना सांगितलं १८ जानेवारी रोजी विवेक दुकानातलं काम संपवून घरी जाण्यासाठी दुकानातून बाहेर पडत होता. त्याचवेळी फॉकनरने हातोडीच्या सहाय्याने विवेकवर हल्ला केला. हातोडीने आधी त्याचं डोकं फोडलं. त्यानंतर चाकूने त्याचा चेहरा आणि डोक्यावर अनेक वार केले. तो बराच वेळ विवेकच्या चेहऱ्यावर वार करत होता. त्याने विवेकच्या चेहऱ्याचा चेंदा-मेंदा केला. डब्ल्यूएसबी-टीव्हीच्या वृत्तानुसार फॉकनरने विवेकची हत्या केल्यानंतर काही वेळाने तिथे पोलीस आले. तेव्हा फॉकनर चाकू आणि हातोडी घेऊन तिथेच उभा होता. फॉकनर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian student brutally killed by homeless man in georgia us after sheltering him for few days asc