Canada Shooting Indian Student dead: बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या २१ वर्षीय हरसिमरत रंधावा या विद्यार्थीनीचा कॅनडामध्ये मृत्यू झाला आहे. ओंटारिओमधील हॅमिल्टन बस स्टॉपवर उभी असताना बुधवारी सांयकाळी हरसिमरतला गोळी लागली. दोन वाहनातून एकमेकांवर गोळीबार करत असताना त्यापैकी एक गोळी निष्पाप हरसिमरतला लागली. ती मोहॉक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मागच्या चार महिन्यात कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू होत असून हरसिमरत या चौथ्या विद्यार्थीनीचा आता मृत्यू झाला आहे.

हॅमिल्टन पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. हरसिमरत रंधावाचा गोळीबाराच्या घटनेशी काही एक संबंध नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर जेम्स आणि साऊथ बेंड रस्त्यावर दोन वाहनातून एकमेकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी बस स्टॉपवर उभ्या असलेल्या हरसिमरतच्या छातीला गोळी लागली. यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दोन वाहनातून एकमेकांवर गोळीबार होत असल्याचे चित्रण हाती लागले आहे. गोळीबारात विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही वाहनांनी घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबारात परिसरातील एका घराच्या खिडकीलाही गोळी लागली. मात्र यात घरातील कुणालाही दुखापत झाली नाही.

सदर घटनेनंतर टोरंटोमधील वाणिज्य दुतावासाने शोक व्यक्त केला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “ओंटारियो येथे भारतीय विद्यार्थीनी हरसिमरत रंधावाच्या दुःखद मृत्यूमुळे आम्हाला तीव्र दुःख झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती निष्पाप असून गोळीबाराशी तिचा काही एक संबंध नव्हता. हत्येचा तपास सुरू आहे. आम्ही हरसिमरतच्या कुटुंबियांशी संपर्कात आहोत. त्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यात येत आहे. या कठीण काळात शोकाकूल कुटुंबाबरोबर आहोत.”