युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धामध्ये खार्किव्ह शहरात एक मार्च रोजी झालेल्या तोफमाऱ्यामध्ये नवीन शेखरप्पा ज्ञानगौडा हा २१ वर्षीय विद्यार्थी मृत्यूमुखी पडला. या घटनेनंतर कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात राहणाऱ्या नवीनच्या कुटुंबियांना अनेकजण भेट देऊन त्यांचं सांत्वन करत आहेत. केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनीही नवीनच्या वडिलांची भेट घेतली. मात्र या भेटीपूर्वी जोशी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. तर याच वक्तव्याचं खंडन करणारं मत नवीनच्या वडिलांनी नोंदवलं आहे.
नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका
जोशी काय म्हणाले होते?
एका मुलाखतीमध्ये धारवाडचे भाजपा खासदार असणाऱ्या जोशी यांनी परदेशात वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणासाठी जाणारे ९० टक्के विद्यार्थी भारतामधील वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. जोशींनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमधील या वक्तव्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली. विरोधकांनीही या प्रकरणावरुन जोशी यांच्यावर टीका केली.
भेटीदरम्यानही सुनावलं…
एकीकडे युद्धग्रस्त युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले असताना मंत्र्याने असं वक्तव्य केल्याने नाराजी व्यक्त केली जातेय. त्यातच जोशी हे युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या नवीनच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता तिथेही त्यांना त्यांच्या या वक्तव्यावरुन सुनावण्यात आलं.
नक्की वाचा >> Ukraine War: “तो किराणामालाच्या दुकानासमोर उभा होता, अन् तितक्यात…”; भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूचा घटनाक्रम
आमच्या मुलांना भारतात शिक्षण देणं परवडत नाही…
नवीनप्रमाणेच युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अमित वैसर या विद्यार्थ्याच्या वडिलांनी मंत्र्यांना चांगलाच टोला लगावला. अमितचे वडील व्यंकटेश यांनी, “नवीन असो किंवा माझा मुलगा असो दोघेही नापास झालेले विद्यार्थी नाहीयत. दोघांनीही एसएसएलसी आणि पीयू परीक्षांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेत. आम्हाला आमच्या मुलांना भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण देणं परवडत नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही आम्हाला आमच्या मुलांना शिक्षणासाठी युक्रेनला पाठवावं लागतं,” असं जोशींना सांगितलं.
नक्की वाचा >> Ukraine War: “ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरुन नाव न घेता पटोलेंचा मोदींना टोला
तो निर्णय महागात पडला…
नवीनच्या मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर शेखरप्पा यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र या धक्क्यातून थोडं सावरल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलाला युक्रेनला पाठवण्याचा निर्णय आर्थिक दृष्ट्या स्वस्त वाटला पण तो फार महागात पडल्याची प्रतिक्रिया नोंदवली. “माझा मुलगा फार हुशार होता, त्याला ९७ टक्के गुण मिळायचे पण मेडिकलची सीट मिळाली नाही म्हणून त्याला युक्रेनला पाठवावं लागलं,” असं सांगतानाच शेखरप्पा यांनी भारतामधील वैद्यकीय शिक्षण पद्धतीवर टीका केलीय.
नक्की वाचा >> “आमच्याशी भारत सरकारचा संपर्क झाला ही अफवा”; युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यानं सांगितली सत्य परिस्थिती
त्याला ९७ टक्के मिळायचे पण वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही
“माझ्या मुलाला ९७ टक्के गुण मिळायचे. तो शाळेमध्ये पहिला यायाच. मात्र त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, देशात ८५ लाख ते एक कोटी रुपये खर्च करुन कधीच माझ्या मुलाला खासगी विद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही. एवढा खर्च करण्याची आमची क्षमता नव्हती. त्यामुळेच मुलाला युक्रेनला पाठवणं थोडं फरवडण्यासारखं आहे असा विचार करुन त्याला तिकडे पाठवलं होतं. मात्र हा निर्णय आम्हाला फार महगात पडला, आज माझा मुलगाच माझ्या सोबत नाहीय,” असं शेखरप्पा म्हणाले.
नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल
भारतीय दूतावासाकडून मदत नाही…
शेखरप्पा ज्ञानगौडा यांनी, ‘भारतीय दूतावासातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी अडून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधला नाही,’ असा आरोप केलाय. खार्कीव्हमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून ते बंकरमध्ये राहत आहेत. नवीन हा खार्कीव्ह वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चौथ्या वर्षाला शिकत होता.
नवीन सोबत घडलं काय?
नवीन हा काही खाणं आणण्यासाठी आणि चलन बदली करुन घेण्यासाठी बंकर बाहेर पडला होता अशी माहिती त्याचे काका उज्जनगौडा यांनी घडलेल्या घटनाक्रमाबद्दल बोलताना दिली. खार्कीव्हमधील बंकरमध्ये नवीन हा त्याच्यासोबतच्या काही भारतीय विद्यार्थ्यांसोबत मागील काही दिवसांपासून राहत होता. चलन बदली करुन घेण्यासाठी आणि खाणं आणण्यासाठी तो बंकर बाहेर पडला होता. त्याचवेळी हल्ला झाला ज्यात नवीनचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचं त्याच्या काकांनी सांगितलंय.
नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न
मोदींचा फोन…
उज्जनगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी नवीनने वडिलांना फोन केला तेव्हा बंकरमधील पाणी आणि खाद्य पदार्थ संपल्याची माहिती त्याने दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने नवीन याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देत विद्यार्थ्यांसह भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला गती देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन याच्या वडिलांशी संपर्क करून शोक व्यक्त केला.