Indian Student : २७ वर्षांच्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली. हा विद्यार्थी हैदराबादचा आहे. गम्पा प्रवीण कुमार असं या २७ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. विस्कॉन्सिनमधली मिल्वॉकी या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून गम्पा प्रवीण कुमार या भारतीय विद्यार्थ्याची हत्या केली. एका स्टोअरमध्ये प्रवीण कुमार पार्ट टाइम काम करत होता. त्या दुकानावर या हल्लेखोरांनी दरोडा टाकला. त्यावेळी केलेल्या गोळीबारात प्रवीणचा जीव गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्याचा रहिवासी होता प्रवीण

गम्पा प्रवीण कुमार हा तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने डेटा सायन्समधून शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो विस्कॉन्सिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेला होता. त्या अभ्यासक्रमाचं त्याचं दुसरं वर्ष सुरु होतं. त्यावेळीच त्याचा कोर्स संपण्यासाठी चार महिने राहिले होते ते पूर्ण होण्याआधीच त्याची हत्या करण्यात आली.

प्रवीणच्या वडिलांची मन सून्न करणारी प्रतिक्रिया

ऑगस्ट २०२३ मध्ये गम्पा प्रवीण कुमार अमेरिकेला गेला होता. त्याने हैदरबाद या ठिकाणी बी टेक केलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. जानेवारी महिन्यात तो भारतात आला होता. त्याचा कोर्स संपण्यासाठी फक्त चार महिनेच राहिले होते. त्याने अमेरिकेतच नोकरी करुन तिथे राहण्याचं ठरवलं होतं. मात्र त्याआधीच माझ्या मुलाची हत्या करण्यात आली. आता आम्ही कुणाकडे बघायचं? काय करायचं हे मला काहीच सुचत नाही अशी मन सून्न करणारी प्रतिक्रिया त्याचे वडिल राघवुलू यांनी दिली आहे.

आम्हाला फोन आला होता आणि…

त्याचे वडील पुढे म्हणाले बुधवारी पहाटे २.५० ला मला त्याचा कॉल आला होता पण मी तो उचलू शकलो नाही. त्यानंतर आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या कुणीतरी फोन घेतला आणि आम्हाला आमच्या मुलाची जन्मतारीख विचारली. आधी आम्हाला वाटलं की हा फ्रॉड कॉल असावा. पण नंतर कळलं की त्याच्या मित्रांपैकी एकाने आमचा फोन कॉल घेतला. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना पोलिसांनी सांगितलं आहे की प्रवीणची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांकडे बंदुका होत्या दरोड्याच्या उद्देशाने ते दुकानात शिरले होते. तिथे गोळीबार झाला. त्याच घटनेत माझा मुलगा ठार झाला. आता आमच्यासाठी सगळंच संपलं आहे असं प्रवीणच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं. या घटनेनंतर प्रवीण कुमारच्या आईला जबरदस्त धक्का बसला आहे आणि त्या खूप अस्वस्थ झाल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

प्रवीण कुमार ज्या विद्यापीठात शिकत होता त्या विद्यापीठानेही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. आम्ही प्रवीणच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत तसंच आम्ही आमच्या परिने जो लागेल तो पाठिंबा प्रवीणच्या कुटुंबाला देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.