वरुण नावाच्या २४ वर्षीय भारतीय मुलाच्या डोक्यात एका स्थानिक तरुणानं चाकू भोसकल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे. इंडियानामधील व्हॅलपरेसो शहरामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यानंतर वरुणला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्यांची वाचण्याची शक्यता शुन्य ते ५ टक्के इतकीच असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एनडीटीव्हीनं नॉर्थवेस्ट इंडियाना टाईम्सच्या हवाल्याने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण रविवारी सकाळच्या सुमारास शहरातील एका सार्वजनिक जिमममध्ये गेला असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात आपल्या कबुली जबाबात आरोपी जॉर्डन अँड्रॅडनं माहिती दिली आहे. जॉर्डन सकाळी जिमच्या मसाज रुममध्ये गेला असता तिथे वरुण आधीच हजर होता.

“मी मसाज रूममध्ये गेलो तेव्हा मला वरुण थोडा विचित्र वाटला. त्याच्याकडून माझ्या जिवाला धोका असून तो माझ्यावर जीवघेणा हल्ला करू शकतो, असं मला वाटलं. त्यामुळे फक्त आपला जीव वाचवण्यासाठी मी त्याच्यावर हल्ला केला”, असं जॉर्डननं म्हटलं आहे.

थेट डोक्यात भोसकलं

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा घडला तेव्हा नेमकं काय झालं? याविषयी विचारणा केली असता आरोपी जॉर्डननं त्यावर वरवरची उत्तरं दिली. “मी आत गेलो तेव्हा वरुण मसाज चेअरवर बसला होता. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला डोक्यात चाकूने भोसकलं. त्यावेळी आमच्यात कोणतीही झटापट झाली नाही. फक्त मी त्याच्यावर हल्ला केल्यानंतर मला विरोध करण्यासाठी त्यानं मला स्पर्श केला असेल तर तेवढाच”, असं जॉर्डननं पोलिसांना सांगितलं.

वरुणवर शहरातल्या वेन रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून जॉर्डनचा चाकू ताब्यात घेतला आहे.

Story img Loader