Indian Student Vanshika Death in Canada : कॅनडाच्या ओटावा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाची विद्यार्थिनी वंशिका हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून वंशिकाचा मृतदेह ओटावातील एका समुद्रकिनाऱ्याजवळ संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा ओटावा पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती सांगितली जात आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार कुलजीत सिंह रंधावा यांचे जवळचे सहकारी तथा ‘आप’चे नेते दविंदर सैनी यांची वंशिका मुलगी होती. वंशिका ही मूळ पंजाबची रहिवाशी आहे. तसेच अडीच वर्षांपूर्वी वंशिका ओटावा या ठिकाणी शिक्षणासाठी गेली होती. मात्र, २५ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी वंशिका घरातून बाहेर पडली आणि पुन्हा परत आलीच नाही. त्यानंतर तिचा फोनही बंद झाला आणि पुन्हा संपर्क झाला नाही.

वंशिका सैनी हिचा मृतदेह ओटावा येथील एका समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. दविंदर सैनी यांना २५ एप्रिल रोजी मुलगी वंशिका ही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. वंशिकाच्या एका मैत्रिणीने तिच्या कुटुंबाला या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर वंशिकाच्या कुटुंबाने तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर ओटावा येथील दूतावासाशी ऑनलाइन संपर्क साधल्यानंतर वंशिका बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, वंशिका सैनी हिच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वंशिकाचे तिच्या कुटुंबाबरोबर २२ एप्रिल रोजी फोनवर शेवटचं बोलणं झालं होतं. दरम्यान, आमदार कुलजीत सिंह रंधावा यांनी या घटनेसंदर्भात म्हटलं की, “वंशिकाच्या मृत्यूने आम्हाला खूप दुःख झालं. ती डेरा बस्सी येथील तिच्या शाळेत टॉपर होती आणि आता कॅनडामध्ये शिक्षण घेत होती. दविंदर हे माझे जवळचे सहकारी आहेत आणि माझ्या कार्यालयाचे प्रभारी आहे. आमच्यासाठी ही घटना खूप धक्कादायक आहे.”

वंशिकाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून यासाठी आम आदमी पक्षाचे काही नेते केंद्र सरकारशी संपर्क करत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच वंशिकाचा मृतदेह परत आणण्यासाठी संबंधित दूतावासालाही पत्र लिहिल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच वंशिकाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.