नासाच्या हय़ूमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज स्पर्धेत एकूण ८० संघ सहभागी झाले असून, त्यात भारतीय विद्यार्थ्यांच्या चार संघांचा समावेश आहे. मंगळ, दूरचे ग्रह, लघुग्रह व ग्रहांचे चंद्र यांच्यावर पाठवण्यात येणाऱ्या रोव्हर गाडीची रचना कशी असावी ते सुचवण्याबाबत ही स्पर्धा आयोजित केली आहे. भारत, अमेरिका, इटली, जर्मनी, मेक्सिको, कोलंबिया, रशिया व प्युटरेरिको या देशांतील एकूण ८० संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नासाची वार्षिक रोव्हर चॅलेंज स्पर्धा ८ एप्रिलला अलाबामा येथील यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथे सुरू होत आहे. यात भारताच्या वतीने मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग (महाराष्ट्र), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (रूरकी, उत्तराखंड), सत्यभामा विद्यापीठ (तमिळनाडू), स्कायलाइन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (उत्तर प्रदेश) या संस्थांचे संघ सहभागी झाले आहेत.

रोव्हर चॅलेंज स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रोव्हर गाडीची रचना सांगायची असून, त्याची चाचणी, ऊर्जापुरवठा यांची माहिती देणे अपेक्षित आहे. दूरस्थ ग्रह, लघुग्रह व ग्रहांचे चंद्र यांच्या पृष्ठभूमीवर चालू शकतील अशी रोव्हर गाडय़ांची रचना अपेक्षित आहे.

९ एप्रिलला डेव्हिडसन सेंटर फॉर स्पेस एक्सप्लोरेशन या संस्थेत या स्पर्धेचा समारोप होणार असून त्यात सर्वोत्तम संघाला पुरस्कार दिला जाईल.

या वेळी स्पर्धक संघांना गाडीची चाके तयार करण्यास सांगण्यात आले आहे. यांत्रिक बाहूने द्रव, खडक, माती यांचे नमुने घेणाऱ्या गाडय़ांचा एक प्रकार यात असेल. नासाची मंगळ मोहिमेची इच्छा दृढ असून त्यासाठी तेथील पृष्ठभागावर चालू शकेल अशी गाडी तयार करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे.

Story img Loader