Indian Studentes Feared Of Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी तब्बल ४२ निर्णयांवर स्वाक्षरी केली. यामध्ये कॅनडा व मेक्सिकोवर अतिरिक्त आयात शुल्क आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. याच निर्णयांमध्ये अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या इतर देशातील नागरिकांना देशाबाहेर काढण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचा निर्णयही ट्रम्प यांनी घेतला आहे. यामुळे इतर देशातील नागरिकांप्रमाणेच अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांपैकी २० हजार भारतीयांवर हद्दपारीची टांगती तलवार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ट्रम्प हद्दपारीबाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे अमेरिकेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी पार्ट टाइम नोकऱ्या सोडण्यास सुरू केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या काही आठवड्यांपूर्वी, अमेरिकेतील अनेक भारतीय विद्यार्थ्यी कॉलेजच्या वेळेनंतर अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी पार्ट टाइम नोकऱ्या करायचे. पण, हद्दपारीच्या भीतीने त्यांनी आपले काम सोडण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत टिकून राहण्यासाठी अशा नोकऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरी, अमेरिकन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मोठ्या कर्जांमुळे ते त्यांचे भविष्य धोक्यात घालू शकत नाहीत, असे काही विद्यार्थ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना २० तास काम करण्याची परवानगी
अमेरिकेच्या नियमांनुसार एफ-१ व्हिसावर अमेरिकेत आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये आठवड्यातून २० तास काम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे, अनेक विद्यार्थी भाडे, किराणा सामान आणि इतर राहणीमान खर्च भागवण्यासाठी कॅम्पसबाहेर आणि रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप किंवा किरकोळ दुकानांमध्ये कागदपत्रांशिवाय काम करतात. आता, नवीन प्रशासनाने इमिग्रेशन धोरणांभोवतीचे बंधन कडक करण्याचे आणि कठोर नियम लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ते पार्ट टाइम नोकऱ्या सोडून देत आहेत.
अमेरिकेतील सर्वाधिक परदेशी नागरिक भारतातील
आज जवळपास ३ लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत कामासाठी दिला जाणारा एच वन बी व्हिसा मिळवणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. इतर कोणत्याही देशातील नागरिकांपेक्षा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचं प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यापैकी तब्बल २० हजार भारतीयांना हद्दपारीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अपुऱ्या कागदपत्रांमुळे या भारतीयांवर स्थानिक पद्धतीनुसार कायदेशीर कारवाई चालू आहे. मात्र, आता ट्रम्प यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे या २० हजार भारतीयांना तातडीने अमेरिकेतून परत पाठवलं जाण्याची शक्यता आहे.
२० हजार भारतीय कागदपत्रांशिवाय अमेरिकेत
कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा पुरेशा कागदपत्रांशिवाय अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची संख्या जवळपास २० हजार ४०७ असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे. यामध्ये अंतिम निर्वास आदेश अर्थात Final Removal Orders जारी झालेल्या भारतीयांचा समावेश आहे. त्याशिवाय, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट अर्थात ICE विभागाच्या ताब्यात असणाऱ्या भारतीयांचाही यात समावेश आहे. यापैकी १७ हजार ९४० भारतीयांकडे आवश्यक ती कागदपत्रे नाहीत, पण ते अमेपिकन प्रशासनाच्या ताब्यात नाहीत. मात्र, इतर २ हजार ४६७ भारतीय मात्र आयसीईच्या ताब्यात आहेत.