भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वाद साऱ्या जगाला ठाऊक आहे. मात्र असे असताना सर्व र्निबधांना बाजूला सारत पाकिस्तानने दाखवलेल्या माणुसकीमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या एका भारतीय नागरिकाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले.
प्रवासातच हृदयविकाराचा झटका आलेल्या भारतीय प्रवाशासाठी विमान तातडीने कराची विमानतळावर उतरून वैद्यकीय उपचार देण्यासाठी पाकिस्तानी प्रशासनाने एकच धावपळ केली.
७५ वर्षीय वासन बोंडल हे तुर्कस्थान एअरलाइनच्या विमानाने इस्तंबूल ते मुंबई असा प्रवास ६ जुलै रोजी करीत होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे विमानाच्या पायलटने तातडीने कराची आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधून तातडीने विमान उतरवण्याची परवानगी मागितली. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने लागलीच विमान उतरवण्याची परवानगी दिली आणि वैद्यकीय सुविधा तयार ठेवल्या. विमान उतरताच बोंडल यांना तातडीने सर्वात मोठय़ा आगा खान रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली.
बोंडल यांच्या मुलाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी तातडीचा व्हिसा मिळावा म्हणून विनंती केली. त्यावर पाकिस्तान उच्चायुक्तालयानेदेखील लगेचच व्हिसा मंजूर केल्याची माहिती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी दिली.