जगातील अग्रमानांकित २०० शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतीय विद्यापीठांचे स्थान फारसे मानाचे नाही, ही बाब अत्यंत वेदनादायी असून भारतीय विद्यापीठांनी अग्रेसर राहायला हवे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले.
नव्याने सुरू झालेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम- काशिपूर)चा पहिला दीक्षान्त समारंभ राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. जगभरातील विद्यापीठांच्या दर्जाचे मूल्यमापन करणारी मानांकने जाहीर झाली. मात्र एकाही भारतीय विद्यापीठाला पहिल्या २०० शैक्षणिक संस्थांच्या यादीत स्थान मिळवता आले नाही, ही बाब प्रशंसनीय नाही, अशी खंत राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
भारतातील विद्यापीठांनी आपला दर्जा आणि जागतिक व्यासपीठावरील आपले स्थान सुधारण्यासाठी कंबर कसायला हवी, याची जाणीवही मुखर्जी यांनी आपल्या भाषणात करून दिली. व्यवस्थापनतज्ज्ञांची सध्या वानवा आहे आणि या क्षेत्रात अधिकाधिक तज्ज्ञांची गरज आहे, असे प्रणब मुखर्जी यांनी सांगितले.
जगातील सर्वोत्तमांसमोर टिकण्यासाठी आणि त्यांच्याही पुढे जाण्यासाठी भारतीय उद्योग क्षेत्राने भरारी घेणे गरजेचे आहे आणि ही भरारी घेण्यासाठी उत्तम व्यवस्थापनतज्ज्ञ मोठय़ा संख्येने उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. वाणिज्य आणि व्यवस्थापन या क्षेत्रांत २००६-०७ या वर्षी २३ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. हीच संख्या २०११-१२ या वर्षी ३४ लाख झाली आहे आणि आगामी काळात याच क्षेत्रांमध्ये पदवीधर तसेच द्विपदवीधर विद्यार्थ्यांना असलेली मागणी चढीच राहील, असा अंदाजही राष्ट्रपतींनी वर्तविला.
बौद्धिक स्वामित्वासाठी भारतातर्फे गतवर्षी ४२ हजार अर्ज दाखल झाले होते. मात्र चीन आणि अमेरिका या देशांमधील अशा अर्जाची संख्या साधारण ६ लाख होती या आकडेवारीची आठवण करून देत मुखर्जी म्हणाले की, आपल्या देशात सर्जनशीलता आणि कल्पकतेला चालना देणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने शैक्षणिक संस्थांमध्ये वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.

Story img Loader