भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अनेक महिला कुस्तीपटू तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. त्यांना पुरुष कुस्तीपटूंचीही साथ होती. मात्र, तेव्हा दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा हे कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. यावेळी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचं मेडल भारतासाठी जिंकून आणणारी कुस्तीपटू विनेश फोगाटनं भारतीय क्रीडाविश्वाला परखड सवाल केले आहेत.
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या तिघांसमवेत मोठ्या संख्येनं कुस्तीपटू जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी “कुस्तीपटूंमध्ये शिस्त असायला हवी, त्यांनी आधी आमच्याकडे येऊन भूमिका मांडायला हवी होती”, असं म्हटल्यानंतर त्यावरही आंदोलक कुस्तीपटूंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व प्रकरणावर कुस्तीपटू विनेश फोगाटनं भारतातील आघाडीचे क्रिकेटपटू आणि इतर क्रीडाक्षेत्रातील आघाडीच्या खेळाडूंना परखड सवाल केले आहेत.
“आख्खा देश क्रिकेटची पूजा करतो, पण…”
विनेश फोगाटनं आंदोलनाबाबत क्रिकेटपटूंच्या मौनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “आख्खा देश क्रिकेटची पूजा करतो. पण या विषयावर आजपर्यंत एकही क्रिकेटपटू बोललेला नाही. आम्ही असं म्हणत नाहीये की तुम्ही आमच्या बाजूने बोला. पण किमान या प्रकरणात ज्या कुठल्या बाजूचं म्हणणं खरं असेल, त्यांना न्याय मिळायला हवा, असा तटस्थ संदेश तरी द्या. मला याचं दु:ख होतंय. मग ते क्रिकेटपटू असोत, बॅडमिंटन खेळाडू असोत, अॅथलिट्स असोत, बॉक्सिंग खेळाडू असोत”, असं विनेश फोगाट म्हणाली.
“ब्लॅक लाईव्हज मॅटर्सला पाठिंबा देऊ शकता, मग..”
यावेळी विनेश फोगाटनं अमेरिकेतील Black Lives Matters या मोहिमेचाही संदर्भ दिला. “आपल्या देशात मोठे अॅथलिट्स नाहीत असं अजिबात नाहीये. आपल्याकडे अनेक मोठे क्रिकेटपटू आहेत. ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्सच्या मोहिमेवेळी या सगळ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. आम्ही तेवढाही पाठिंबा मिळण्यासाठी पात्र नाही आहोत का?” असा सवालच विनेश फोगाटनं उपस्थित केला आहे.
“सगळ्या खेळाडूंना नेमकी कसली भीती वाटतेय?”
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा न देण्यासाठी इतर खेळाडूंना कसली भीती वाटतेय? असा प्रश्नही विनेश फोगाटनं उपस्थित केला आहे. “मी आणि बजरंग पुनियानं अनेक खुली पत्रं लिहिली, व्हिडीओ पोस्ट केले ज्यात इतर खेळाडूंना बोलण्याची विनंती केली होती. पण त्यांना नेमकी कशाची भीती वाटतेय हे आम्हाला माहिती नाही. मी समजू शकते की त्यांना स्पॉन्सरशिप गमावण्याची किंवा ब्रँड एंडॉर्समेंटचे करार मोडण्याची काळजी असेल. कदाचित त्यामुळेच त्यांना आंदोलन करणाऱ्या खेळाडूंशी नाव जोडलं जाण्याची भीती असेल. पण त्याचं मला दु:ख होतंय”, अशा शब्दांत विनेश फोगाटनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.